दुसरा टप्पा : केवळ ६५ रुपयात ९ वॅटचे दिवेयवतमाळ : केंद्र सरकार आणि महावितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उर्जा बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उजाला’ योजनेचा दुसरा टप्पा येत्या दोन-तीन दिवसात यवतमाळ शहरात राबविण्यात येत आहे. उल्लेखनिय म्हणजे एका बिलावर प्रत्येकी ६५ रुपयांप्रमाणे नऊ वॅटचे दहा दिवे मिळू शकतील. पहिल्या टप्प्यात सात वॅटच्या दिव्याची किंमत शंभर रुपये होती. त्यामुळे आता ही योजना अधिक ग्राहकाभिमुख करण्यात आली आहे.महावितरणच्या मुख्य कार्यालयासह शहरातील इतर ठिकाणी दिलेल्या पॉइंटवरून या दिव्यांची विक्री सुरू करण्यात येईल. राज्यात सध्या मुंबई, पणे, अहमदनगर व ठाणे येथे तर विदर्भात सध्या अकोला व अमरावतीला हा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यानंतर आता यवतमाळचा समावेश करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्येही टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एनर्जी इफीशीयन्सी सर्व्हिस लिमिटेड’ कंपनीमार्फत ही योजना देशपातळीवर राबविली जात आहे. नागरिकांना एका विद्युत बिलावर ९ वॅटचे जास्तीज जास्त दहा बल्ब मिळू शकेल. विद्युत बिल नसल्यास आधार कार्ड अथवा दुसरे अधिकृत आयडी प्रुफही चालू शकेल. या योजनेमुळे उर्जा बचतीसह ग्राहकांच्या वी बिलात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आर्थिक बचत होणार आहे. शहरातील हजारो वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला आहे. यापूर्वी सात वॅटचा बल्ब १०० रुपयाला होता. यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला असून केवळ ६५ रुपयाला नऊ वॅटचा बल्ब मिळेल. दरम्यान बाजारात अशाचप्रकारचे चायनीज कंपन्यांचे दिवे असल्याने ग्राहकांनी ‘इएसएल’ मार्क बघूनच दिवे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
उजाला योजना नव्या स्वरुपात
By admin | Published: February 03, 2017 2:12 AM