बस नादुरुस्त : कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास लागला होता उशीर उमरखेड : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या दिवशी मतदानानंतर मतदान यंत्र घेऊन उमरखेडकडे निघालेल्या तीन एसटी बसेस नादुरुस्त झाल्याप्रकरणी येथील आगार प्रमुख व सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले. १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान घेण्यात आले. मतदान यंत्र येथील तहसीलमध्ये आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून बस घेण्यात आल्या होत्या. मतदान आटोपल्यानंतर सर्व बसेस उमरखेडकडे परत येत होत्या. यापैकी निंगनूर येथून निघालेल्या बसचे इंजीन नादुरुस्त झाले. त्यामुळे ती रस्त्यातच अडकून पडली. दुसऱ्या घटनेत दराटी येथून निघालेली बस रस्त्यातच घनदाट जंगलात पंक्चर झाली. तिसऱ्या घटनेत गाढीबोरी येथून निघालेली बस एका नाल्यात फसली होती. या तीन बसेस रस्त्यातच नादुरुस्त झाल्यामुळे त्यामध्ये १२५ कर्मचारी व मतदान यंत्र अडकून पडले होते. या तीनही बस तब्बल तीन तास उशिराने पोहोचल्या होत्या. त्या निर्धारित वेळेत तहसीलमध्ये पोहचू शकल्या नव्हत्या. निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलीस बंदोबस्त व दुसरी वाहने तिकडे रवाना केली होती. त्यानंतर रात्री तब्बल १.३० वाजता सर्व कर्मचारी मतदान यंत्रासह तहसीलमध्ये पोहोचले होते. या प्रकरणी आगार प्रमुख मंगेश पांडे व सहायक वाहतूक अधीक्षक एस.डी. नाटकर यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर अखेर या दोघांनाही निलंबित केल्याचे आदेश विभागीय नियंत्रक अशोक वरठे यांनी दिले आहेत. (शहर प्रतिनिधी)
उमरखेडचे एसटी आगार प्रमुख, वाहतूक अधीक्षक निलंबित
By admin | Published: February 23, 2017 1:02 AM