अखिलेशकुमार सिंह : जातीय सलोख्यासाठी पोलिसांचे पुन्हा प्रयत्नअविनाश खंदारे उमरखेड गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल. परंतु या प्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीला नाहक त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे उमरखेड शहरातील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गणेश विसर्जनाच्या दिवशी उमरखेड शहरात मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. यात पोलीस अधिकारी-कर्मचारी व नागरिक जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळेच स्थिती नियंत्रणात आली असे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात ४२ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास घेत आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दोन गटांच्या वादात कोण दोषी आहे याचा शोध घेणे सुरू आहे. कुणावरच हेतुपुरस्सर अन्याय केला जाणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर मात्र कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.मी स्वत: गेल्या तीन दिवसांपासून उमरखेड शहरात तळ ठोकून आहो. शहरात पायी फेरफटका मारुन सलोखा निर्माण करण्यासाठी बैठका घेत आहो. नागरिकांशी संवाद साधत आहो. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कुठलीही भीतीची भावना राहू नये यासाठी शहरातील आठवडीबाजार, तारपुरा वार्ड, उमरखेड बसस्थानक, पुसद रोड, महागाव रोड, नांदेड रोड, नाग चौक या भागात फेरफटका मारला. नागरिकांना शांततेचा आवाहन करीत आहो. गणेश विसर्जन मिरवणूक व मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. आता शहर पूर्वपदावर आले असून शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांची करड नजर असल्याचे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. उमरखेड शहरात रात्री मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केली जात आहे. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. रात्रीला संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी रात्री १० वाजतानंतर विनाकारण बाहेर निघू नये, कुणी यावेळी संशयित वाटला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उमरखेड शहरातून अनेक जण बाहेरगावी गेले आहे. त्यांनी शहरात परतावे, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
उमरखेडकरांनो, भीती बाळगू नका
By admin | Published: September 21, 2016 1:57 AM