अविनाश खंदारे
उमरखेड : तालुक्यात बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. अनेक रस्ते बंद झाले. ४० गावांचा संपर्क तुटला. पैनगंगा नदी दुधडी भरून वाहत असल्याने चातारी गावात पाणी शिरले. अनेक गावांतील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. ८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मात्र, दहागाव येथील नाल्यात वाहून जाणाऱ्या युवकाला वाचविण्यात यश आले.
काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. बुधवारी सायंकाळपासून मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रात्रभर पाऊस धो-धो बरसला. मध्यरात्री तालुक्यातील सर्वच नाल्यांना पूर आला. त्यामुळे उमरखेड-पुसद, ढाणकी-बिटरगाव, ढाणकी-फुलसावंगी, ढाणकी-गांजेगाव, ब्राह्मणगाव-हिमायतनगर, उमरखेड-ढाणकीसह ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद झाल्याने वाहतूक ठप्प पडली होती.
गुरुवारी सकाळी १० वाजतानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सर्व रस्ते सुरू झाले. तालुक्याची जीवनदायीनी असलेली पैनगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे. पात्राच्या बाहेर पाणी येऊन चातारी गावात शिरले. त्यामुळे रस्त्यांवरून गुडघाभर पाणी वाहत होते. नदी, नाल्याकाठच्या ८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. नदी, नाल्याला पूर आल्यास खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार देऊळगावकर यांनी केले आहे.
बॉक्स
दैव बलवत्तर म्हणून तो वाचला
मुसळधार पावसाने पुसद रोडवरील दहागाव नाल्याला पूर आला. त्यात कुपटी येथील विजय दत्ता येलुतवार हा ३० वर्षीय युवक वाहून गेला. मात्र, एका झाडाला तो अडकला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून आदींनी लगेच तहसीलदार आनंद देऊळगावकर, वाहतूक निरीक्षक सचिन खेडेकर यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी त्या युवकाचा भाऊ व गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढले.