अमरावती विभागात द्वितीय : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत वितरण उमरखेड : स्वच्छता, उत्पन्न वाढीचे प्रयत्न आणि अंतर्गत व्यवस्थापनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल येथील नगरपरिषदेला अमरावती विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. दोन कोटी रुपयांचा हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हे नगराध्यक्ष नामदेव ससाणे आणि मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी गुरूवारी स्वीकारला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री डॉ. रणजीत पाटील, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, आयुक्त वीरेंद्र सिंग, सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. उमरखेड नगरपरिषदेने यावर्षी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला. तसेच उत्पन्न वाढविणे आणि अंतर्गत व्यवस्थापनातही उत्कृष्ट कार्य केले. या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेत अमरावती विभागातून व्दितीय क्रमांकाचा दोन कोटी रुपयांचा पुरस्कार दिला. उमरखेड नगरपरिषदेला हा पुरस्कार मिळताच आनंदाचे वातावरण पसरले. पुरस्कार वितरण सोहळ््याला माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, नगरसेवक नितीन भुतडा उपस्थित होते. या पालिकेचा उत्पन्न वाढीचा आदर्श इतर पालिकांसाठी प्रेरणा ठरला आहे. (शहर प्रतिनिधी)
उमरखेड पालिकेला दोन कोटींचा पुरस्कार
By admin | Published: May 05, 2017 2:11 AM