लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : वीज कंपनीकडून वारेमाप येणारी वीज देयके आणि लॉकडाऊनमध्ये वीज बिल माफीच्या आशेने थकलेली देयके, यामुळे अनेक वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढली. सूचना देऊनही ग्राहक बिलाचा भरणा करीत नसल्याने वितरण कंपनीने अनेकांचा वीज पुरवठा खंडित केला. परिणामी विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या नागरिकांनी आता आकोडे टाकून वीज जोडण्या सुरू केल्याचे चित्र तालुक्यात आहे. तसेच कृषी पंपाच्या जोडण्याही अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे.मारेगाव तालुक्यात लाखाच्यावर घरगुती वीज जोडणी असून तीन हजार कृषी पंपाच्या वीज जोडण्या आहेत. या दोन्ही वीज जोडणीची देयके थकलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ होण्याच्या आशेने अनेक ग्राहकांनी देयकाचा भरणा केला नाही. नंतर एकाच वेळेस ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयके प्राप्त झाल्याने मजूरदार व सर्वसामान्य ग्राहक या देयकाचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे वीज वितरणने थकीत ग्राहकांची वीज खंडित केली. परंतु विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या या ग्राहकांनी आकोडे टाकून वीज जोडणी केली. आज ग्रामीण भागात आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याचे प्रमाण खूप वाढले आहे. काही वर्षांपूर्वी रात्री आकोडे टाकून वीज चोरी व्हायची. आता तर दिवस-रात्र अनधिकृत आकोडे टाकून वीज चोरी होत आहे. वीज वितरणचे कर्मचारी चिरीमिरी घेऊन या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे, तर दुसरीकडे कृषी पंपाच्या वीज जोडण्यातही मोठा घोळ आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी पंपाच्या जोडण्या आहेत. परंतु जोडण्या केल्या तेव्हापासून या शेतकऱ्यांना देयकेच पाठविली गेली नाहीत. विशेष म्हणजे बऱ्याच कृषी पंप जोडणीची कार्यालयात नोंदच नाही. अनेक कृषी पंप ग्राहकांची नावे कार्यालयातून गायब आहेत. तालुक्यात विजेची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू असताना महावितरण कंपनीकडून साधी चौकशीही होताना दिसत नाही. गेल्या अनेक वर्षात चोरीच्या कार्यवाहीचा आकडा नगण्य आहे. अनेकांचे मीटर बंद आहे. त्यामुळे वीज चोरी करणाने बिनधास्त झाले आहेत.
१०५ गावांसाठी केवळ दोनच लाईनमन - तालुक्यात १०५ गावे आहेत. या १०५ गावासाठी केवळ दोन लाईनमन आहे. तर एका हेल्परकडे १५ ते २० गावाचा भार आहे. त्यामुळे वीज बिघाड व थकीत वसुली ही दोन कामेच ही मंडळी करीत असतात. आकोडे टाकून होणाऱ्या वीज चोरीची हेल्परला पूर्ण कल्पना असून चिरीमिरी घेऊन हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील प्रकाशाला आकोड्याचा आधार मिळाल्याचे चित्र आहे.