पोलिसांचे दुर्लक्ष : अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अहोरात्र अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. परिणामी शहरात वाहतुकीची कोंडी होते. त्यातच शहरातील बेशिस्त वाहतूक भर घालते. वाहतूक पोलिसांची नियुक्ती असली तरी ते केवळ बघ्याची भूमिका घेतात. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. उमरखेड शहराच्या मध्यभागातून नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर अहोरात्र वाहतूक सुरू असते. ट्रक, कंटेनर आदी अवजड वाहने शहरातून जातात. आधीच शहरातील रस्ते अतिक्रमणाने अरूंद झालेले आहेत. त्यातून लांब कंटेनर शहरात येते तेव्हा वाहतूक पूर्णत: खोळंबते. समोरून येणाऱ्या वाहनाला जाण्यासाठी जागाही राहात नाही. यामुळे अनेकदा अपघातही होतात. शहरातील गायत्री चौक, माहेश्वरी चौक, नांदेड रोड, ढाणकी रोड, पुसद रोड, बसस्थानकासमोर वाहतुकीची कोंडी नेहमीच होते. बसस्थानकासमोर तर आॅटोरिक्षा चालकांचा नेहमीच गोंधळ सुरू असतो. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे वाहनांमध्ये प्रचंड गर्दी आहे. अशा स्थितीत प्रवाशी उमरखेड शहरात उतरतात तेव्हा त्यांना रस्त्यावरील गर्दीचा सामना करावा लागतो. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु एकाही चौकात वाहतूक पोलीस दिसत नाही. चुकून एखादा पोलीस असला तरी तो बघ्याची भूमिका घेतो. ठाणेदारांचेही या परिस्थितीवर नियंत्रण दिसत नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.
उमरखेड शहरात बेशिस्त वाहतूक
By admin | Published: May 08, 2017 12:23 AM