लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मूग, उडीद, सोयाबीन या शेतमाल खरेदीसाठी हमी केंद्र उघडायचे आहे. परंतु जिल्हाभरातून यासाठी एकही प्रस्ताव अद्याप दाखल झाला नसून खरेदी-विक्री संघांनी अघोषित बहिष्कार घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रस्तावच न आल्याने ही खरेदी होणार कशी याचा पेच निर्माण झाला आहे.हमीदरानुसार शेतमालाची खरेदी करण्यासाठी ही केंद्रे सुरू केली जातात. यावर्षीच्या खरीप हंगामातील शेतमाल खरेदी करण्यासाठीसुद्धा जिल्ह्यात हमी केंद्र उघडले जाणार आहे. त्याकरिता मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातून प्रस्ताव बोलावले. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातून एकही प्रस्ताव आला नाही. परिणामी जिल्ह्यात हमी केंद्र सुरू होणार किंवा नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमाल बाजारात येताच शेतमालाचे दर पडतात. त्याचाच प्रत्यय यावर्षीही शेतकऱ्यांना येत आहे.सध्या सोयाबीन, मूग आणि उडीदाचे दर हमीदराच्या खाली गेले आहे. यामुळे शेतकरी हमी केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी तयार आहेत. त्याकरिता प्रारंभी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीची सुरूवात केली आहे. मात्र हे हमी केंद्र अद्याप सुरू झाले नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहे. गतवर्षी १६ केंद्रांवर खरेदी विक्री संघाने शेतमालाची हमी दराने खरेदी केली होती. यावर्षी खरेदी विक्री संघांकडून खरेदीचा कुठलाही प्रस्ताव आला नाही.शेतमाल उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांना हमी केंद्र सुरू करून शेतमाल खरेदी करता येतो. यातील शेतमाल उत्पादक कंपनीला किमान १० लाख रूपयांची ठेव सक्तीची करण्यात आली. इतर सस्थांना ही अट शिथील आहे. तथापि हमी केंद्रांसंदर्भात अद्यापही प्रस्ताव दाखल झाले नाही. यामुळे यावर्षी केंद्र उघडणार किंवा नाही, असा प्रश्न जिल्हाभरातील शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.गतवर्षीचे चुकारे अद्याप बाकीचगतवर्षी खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभºयाचे चुकारे अद्यापही शेतकºयांना मिळाले नाही. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यात यावर्षी अद्याप हमी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात शेतकरी भरडले जात आहे.हमी केंद्र उघडण्याबाबत जिल्हाभरातून प्रस्ताव मागितले गेले आहे. मात्र आजतागायत एकही प्रस्ताव खरेदी-विक्री संघाकडून फेडरेशनला प्राप्त झालेला नाही.- बाळकृष्ण गावंडे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, यवतमाळ
खरेदी-विक्री संघांचा अघोषित बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:04 PM
मूग, उडीद, सोयाबीन या शेतमाल खरेदीसाठी हमी केंद्र उघडायचे आहे. परंतु जिल्हाभरातून यासाठी एकही प्रस्ताव अद्याप दाखल झाला नसून खरेदी-विक्री संघांनी अघोषित बहिष्कार घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रस्तावच न आल्याने ही खरेदी होणार कशी याचा पेच निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देशेतमाल खरेदी : हमी केंद्राचा एकही प्रस्ताव नाही