लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील सावंगा (बु) येथे एका ६० वर्षीय वृद्धेला दागिने चमकवून देण्याच्या नावाखाली भामट्यांनी गंडविले. भामट्यांच्या टोळीतील दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. एकजण फरार आहे.सावंगा येथील वृद्ध महिलेकडे तीन भामटे आले. त्यांनी वृद्धेला अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखविले. वृद्धा धुरपताबाई भिका जाधव यांना हातातील चांदीचे कडे भामट्यांनी मागितले. मात्र, वृद्धेने कडे देण्यास नकार दिला. त्यामुळे भामट्यांनी हातातीलच कड्याला पावडर लावून चमकविले. ते चमकल्याचे बघून धुरपताबाई यांनी दोन्ही हातातील चांदीचे कडे भामट्यांकडे दिले. त्यांनी ते लगेच एका डब्यात टाकून त्यावर काही तरी मिश्रण टाकून पाॅलिश केले नंतर दोन्हीकडे वृद्धेला परत दिले. चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल्या स्वत:कडे घेतल्या. आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. रवींद्रकुमार सदानंद यादव (२५), बिपीनकुमार राजेंद्रप्रसाद यादव (३०) आणि विक्रम यादव (२३, सर्व रा. लतरा जि. भागलपूर (बिहार) अशी भामट्यांची नावे आहे. यापैकी दोघांना गावकऱ्यांनी पकडून बांधून ठेवले. लगेच पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार सोनाजी आमले, पीएसआय नरेंद्र मानकर, विशाल बोरकर, गुणवंत गोटे, सचिन राऊत, दीपक ढगे यांनी सावंगा येथे पोहोचून दोन भामट्यांना साहित्यासह ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
नागरिकांनी बिहारी टोळीपासून सावध राहावेसोने, चांदीचे दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने दागिने लुटणारी टोळी बिहारमधून जिल्ह्यात दाखल झाली आहे. पाण्यात तेजाब टाकून ते दागिने विरघळवितात नंतर तेजाब टाकलेले पाणी घेऊन पळ काढतात. त्यातून सोने व चांदी मिळवितात, अशी माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांना गंडविणारी ही टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा टोळीपासून सावध राहण्याचे आवाहन ठाणेदार सोनाजी आमले यांनी केले.