अरुणावती प्रकल्प : मजुरीवर करावा लागतो उदरनिर्वाहलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जगण्याचे एकमेव साधन अरुणावतीच्या बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीची अपेक्षा होती. परंतु आता नोकरीचे वय उलटून गेले तरी अनेकांना नोकरीच मिळाली नाही. भूमिहीन झालेल्या बेरोजगार तरुणांना मजुरीवर उदरनिर्वाह करावा लागतो.दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. येथे अरुणावती नदीवर प्रकल्प उभारण्यात आला. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ८९४ चौरस किलोमीटर आहे. १९८० साली कामाला सुरुवात झालेल्या या प्रकल्पाची घळ १९९४ मध्ये भरण्यात आली. १९९५ पासून सिंचन सुरू झाले. या प्रकल्पात ११ गावे बुडित क्षेद्धात गेली. येथील शेतकरी भूमिहीन झाले. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तीला ज्येष्ठता यादीनुसार वर्ग ३ व ४ मध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. नोकरी मिळणार या आशेवर अनेकांनी प्रकल्पाला विनाअट जमिनी दिल्या. परंतु अनेक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुण एजबार झाले आहे. त्यामुळे शासकीय नोकरीची आशाही मावळली आहे. शेती धरणात गेली. रोजगाराचा कोणताही आधार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मुले भूमिहीन होवून रोजमजुरी करताना दिसत आहे. सुरुवातीला या बेरोजगारांना मोठमोठाली आश्वासने देण्यात आली. अनेकांना नोकरीचे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु अरुणावती प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरीपासून वंचितच राहिले. नोकरीसाठी शासनाचे दार ठोठावून ही मंडळी आता थकली आहे. आपल्यावरील अन्याय दूर करावा, शासनाला जाग यावी यासाठी प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार तरुण एकत्र येण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाकडून टोलवाटोलवीप्रकल्पग्रस्त तरुणांनी नोकरीच्या आशेने आतापर्यंत अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजविले. परंतु प्रत्येक ठिकाणी टोलवाटोलवी करण्यात आली. अनेकांनी तर नोकरीसाठी अर्ज करणेही आता बंद केले आहे. नोकरी मिळत नसेल तर आम्ही जगावे कसे, असे तरुण म्हणत आहे.
बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना वय उलटूनही नोकरी नाही
By admin | Published: June 23, 2017 1:51 AM