देवेंद्र पोल्हे ल्ल मारेगाववणी उपविभागातील सुमारे दीड हजार हेक्टरवरील मिरची पिकावर अज्ञात रोगाने हल्ला केला असून विविध औषधांच्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात आला नाही. यामुळे मिरची उत्पादक शेतकरी पुरता हादरला आहे. या रोगाच्या संशोधनासाठी बुधवारी दिल्लीचे कृषितज्ज्ञांचे पथक येणार आहे. वणी उपविभागात कापसाने दगा दिल्यानंतर बहुतांश शेतकरी मिरची लागवडीकडे वळले आहे. मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होत आहे. वणी उपविभागात यावर्षी जवळपास दीड हजार हेक्टरवर लागवड झाली. मिरचीच्या लागवडीला एकरी सव्वा ते दीड लाख खर्च येतो. मात्र उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळले होते. परंतु यावर्षी मिरचीवर अज्ञात रोगाने जोरदार हल्ला चढविला आहे. चुरड्या सारखा हा रोग असून झाडाची पाने गुंडाळून गेली आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. या अज्ञात रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाय योजले. परंतु परिणाम झाला नाही. वणी उपविभागासोबतच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मिरचीही अशीच अवस्था आहे. नेमका कोणता रोग मिरचीवर आला याची माहिती व्हावी म्हणून मारेगावचे शेतकरी डॉ.भास्कर महाकुलकर, श्रीनिवास पालमपाटील यांनी भारतीय अनुसंधान कृषी संशोधन संस्था दिल्लीशी संपर्क साधला. मिरचीचे झाड आणि बियाणेही संशोधनासाठी पाठविले. आता वणी विभागातील मिरचीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कृषी संशोधन संस्थेचे दिल्ली, पुणे आणि नागपूर येथील पथक ६ व ७ जानेवारीला वणी उपविभागात येणार आहे. तसचे शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या मिरचीचे बियाणे बोगस असल्याची तक्रार होत आहे. अनेक कंपन्यांनी सीड प्लॉटच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी केली आणि त्यापासून बियाणे बनविले त्यामुळेच शेतकऱ्यांना अज्ञात रोग आल्याचे शेतकरी सांगत आहे. आंध्राचे अण्णाही धास्तावले४यवतमाळ जिल्ह्यात आंध्र प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची शेती करतात. मक्त्याने शेती घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेत आहे. परंतु यावर्षी या मिरचीवरही अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने आंध्र प्रदेशातील अण्णाही चांगलेच धास्तावले आहे.
दीड हजार हेक्टरवरील मिरचीवर अज्ञात रोग
By admin | Published: January 05, 2016 2:52 AM