यवतमाळ : शेतकरी आणि बैल यांचा जिव्हाळा काही औरच असतो. ते जणू एकमेकांचे सख्खे नातेवाईकच असतात. म्हणूनच बैल दगावल्यानंतर एका शेतकऱ्याने चक्क त्याची तेरवी करत गावजेवणाचा कार्यक्रमही केला.
हा जगावेगळा प्रकार झरी तालुक्यातील मुकुटबन गावात घडला. येथील पिंप्रड वाडीमध्ये राहणारे शेतकरी कैलास लाऊजी राऊत यांचा बैल आजाराने मरण पावला. हा बैल गेल्या १७-१८ वर्षांपासून कैलास राऊत यांच्यासोबतच शेतात राबत होता. त्यातून तो जणू राऊत परिवाराचा सदस्यच बनला होता. त्याच्या मृत्यूने दु:खी झालेल्या कैलास यांनी चक्क त्याची रीतीरिवाजाप्रमाणे तेरवी ठेवली. एखाद्या माणसाप्रमाणे बैलाची तेरवी होत असल्याने गावही चकीत झाले. या निमित्त राऊत यांनी गावकऱ्यांना जेवण दिले.
विशेष म्हणजे राऊत यांच्याकडे स्वत:ची शेती नसून ते दुसऱ्याची शेती करतात. त्यातच बैल दगावल्याने त्यांचा मोठा आधार गेला आहे.