सावळी सदोबा : आर्णी तालुक्यातील सावळी परिसरातील वरुड (भक्त) येथील नागरिकांनी रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने आगळेेवेगळे फलक लावून लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविला.
हेटी (यरमल) ते वरुड (भक्त), दहेली, इचोरा, माळेगाव, सावळी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या गावातील नागरिकांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. अखेर शनिवारी वरुड (भक्त) येथील नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला फलक लावले. त्यावर ‘सावधान, वाहनाचा वेग २ किलोमीटर प्रती तासापेक्षा कमी ठेवा, पैसे घेऊन मतदान कराल, तर अशाच रस्त्याने जावे लागेल’, आदी लिहिण्यात आले. एक प्रकारे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना टोमणे मारले.
प्रशासनाकडे कित्येकदा रस्ता दुरुस्तीची मागणी केली. नागरिकांनी शासन दरबारी व्यथा मांडली. मात्र, आश्वासनाशिवाय दुसरे काहीच पदरात पडले नाही. आता पावसाळ्यात चिखलमय रस्त्यामुळे बससेवा बंद झाली. परिसरातील नागरिकांना मोठी कसरत करून प्रवास करवा लागतो. भरपावसात खासगी चारचाकी वाहनही रस्त्यावर धावू शकत नाही. दुचाकीने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.