मारेगाव : तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या दरमहा येणाऱ्या अंदाजे व भरमसाठी देयकाने ग्रामीण वीज ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे. युनिट कमी अन् देयक मात्र जादा, असा प्रकार सतत सुरू आहे. त्यामुळे वीज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे.वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना अंदाजे देयक देण्याचा जणू पायंडाच पाडल्याचे दिसून येत आहे. नाही म्हणायला, दरमहा मीटर रिडींग घेण्यासाठी महावितरणाचा मीटर रिडर आपल्या कॅमेरात मीटरचे छायाचित्र घेतो. त्याने घेतलेल्या छायाचित्रात ग्राहकांनी वापरलेले युनिट स्पष्ट दिसतात. तथापि त्यानंतर येणाऱ्या देयकात मीटरमध्ये वापरलेले युनिट मागे, तर देयकातील युनिट पुढे, अशी अवस्था बघायला मिळते. या देयकात आकड्यांचा जणू खेळ खेळला जातो. त्यातून ग्राहकांची अक्षरश: लूट होत आहेत. वीज वापर कमी असतानासुद्धा किमान ३२ ते ३५ व त्यापेक्षाही पुढे वापरलेले युनिट दाखवून देयक आकारले जाते. एकीकडे वीज ग्राहकांना विजेचा अपव्यय टाळा, वीज काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला जातो. दुसरीकडे किमान ३० युनिट वापरण्याची सक्ती कशाला?, दरमहा अंदाजे देयक द्यायचे असेल तर मीटरचे छायाचित्र घेण्याचे नाटक कशाला?, असा प्रश्न घरगुती वीज ग्राहक उपस्थित करीत आहेत. अंदाजे आणि भरमसाठ येणारी देयके कमी करून देण्याचे नाटक महावितरणकडून वठविले जात आहे. ग्राहकाचे तात्पुरते समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. पुढे येणाऱ्या देयकात मात्र मागील थकबाकीची आवर्जून नोंद केली जाते. दरमहा येणाऱ्या देयकात वीज आकाराव्यतिरिक्त, स्थिर आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार अतिरिक्त आकार, निव्वळ थकबाकी/जमा, समायोजीत आकार, असा वीज ग्राहकांना न समजणारा आकड्यांचा पोरखेळ कंपनी खेळत आहे. वीज वितरण कंपनीचे बदलते, नवखे, अननुभवी मीटर रिडर घरोघरी जाऊन मीटर रिडींग घेतातच याचीही शाश्वती नाही. मागील महिन्यात श्रीरामपूर व समाविष्ट दुर्गम कोलाम पोडातील वीज ग्राहकांचे मीटर रिडींग न करताच अंदाजे देयक पाठवून ग्राहकांना महावितरणने चांगलाच ‘शॉक’ दिला. सोबतच देयक नियमित भरले नाही, तर वीज जोडणी तोडण्याच्या धमक्या महावितरणकडून सुरू असतेच. मीटर रिडींग घेताना लॉक किंवा फॉल्टी लिहून देयक आकारले जाते. जे मीटर फॉल्टी आहे, ते बदलवून देण्याची जबाबदारी वितरण कंपनीची नाही काय, असा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)
युनिट कमी अन् देयक जादा
By admin | Published: March 08, 2015 2:08 AM