सात महिन्यांपासून वेतन नाही : ५०० च्यावर कामगार आंदोलनात उमरखेड (कुपटी) : तब्बल सात महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या वसंत सहकारी साखार कारखान्याच्या कामगारांनी अखेर गुरूवारपासून कामबंद आंदोलन पुकारले. ५०० च्यावर कामगार या आंदोलनात सहभागी झाले असून, कामगारांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर ठिय्या दिला आहे. विदर्भात सहकारी तत्वावर सुरू असलेला एकमेव वसंत सहकारी साखार कारखाना होय. या कारखान्यातील कामगारांना गेल्या एप्रील महिन्यापासून आजपर्यंत वेतनच मिळाले नाही. या कामगारांनी वेतनासाठी वारंवार निवेदने दिली परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. यापूर्वीही वेतनासाठी कामगारांना आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागले होते. गेल्या सात महिन्यापासून वेतन नसल्याने कामगारांनी बोनसवर कशीबशी दिवाळी साजरी केली. परंतु आता त्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे ५०० च्यावर कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन करीत कारखान्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर गुरूवारी ठिय्या दिला. संघटनेने वेळोवेळी प्रशासनासोबत बैठका घेतल्या, कामगारांची बाजु मांडली. परंतु प्रशासनाने व कारखाना अध्यक्ष प्रकाश देवसरकर यांनी कुठलही दखल घेतली नाही. किराणा, दवाखाना, मुलांचे शिक्षण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामगारांनी आंदोलन पुकारल्याने वसंतच्या प्रशासनामध्ये खळबळ उडाली. याची दखल घेत कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश देवसरकर, संचालक अॅड़ अनिल माने, बळवंतराव नाईक, डॉ. राजीव मोतेवार, राजेश देशमुख, सूदर्शन रावते, किशोर वानखडे, रणजीत नलावडे, कार्यकारी संचालक अशोक बोर्डे यांनी कारखाना साईडवर तातडीने बैठक घेतली. त्यात कामगारांच्या मागण्यासंदर्भात चर्चा झाली. कामगार संघटनेचे नेते पी.के. मुडे, व्ही.एम. पतंगराव यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. परंतु कामगारांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. येत्या १० नोव्हेंबरपासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. कारखान्यातील सर्व मशीनरीची कामे झाली आहेत. ऐन कारखाना सुरू करण्याच्या काही दिवस आधी आंदोलनचे पाऊल उचलल्याने वसंत कारखाना प्रशासन व कामगारातील वाद चिघळला आहे. कारखान्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर शेकडो कामगार गुरूवारी ठिय्या देऊन बसले होते. या कामगारांनी प्रचंड नारेबाजी केली. (वार्ताहर)
‘वसंत’च्या कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन
By admin | Published: November 06, 2014 11:03 PM