बाजार समितीत एकूण १८ संचालक आहेत. त्यात राष्ट्रवादीचे आठ, काँग्रेसचे पाच, भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि प्रक्रिया संस्थेचा एक संचालक आहे. माजी आमदार ख्वाजा बेग यांच्या मार्गदर्शनात विद्यमान पदाधिकारी सत्तारुढ झाले. मात्र गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. सहा महिन्यांपूर्वी टीएमसी यार्डमध्ये गोदाम व चाळणीगृह उभारण्यात आले. त्याचे अद्यापही लोकार्पण झाले नाही. निष्क्रिय व अनुभवशून्य कर्मचाऱ्याला प्रभारी सचिवपदाचा कारभार देण्यात आला. तब्बल १४ संचालकांचा विरोध असतानाही सभापती हेकेखोरपणे काम करीत असल्याचा आरोप होत आहे.
विद्यमान पदाधिकारी शेतकरी हिताचे निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र साडेचार वर्षांत शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. माजी आमदारांनीही त्याकडे डोळेझाक केली. परिणामी संचालकांमध्ये असमन्वय निर्माण झाला. शेतकरी हिताचे निर्णय दूर राहिले.
बाॅक्स
माजी आमदारांनी लक्ष देण्याची गरज
माजी आमदार ख्वाजा बेग यांनी बाजार समितीवर लक्ष केंद्रित केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. त्यांनी सभापती व संचालक मंडळाला वठणीवर आणण्याची गरज आहे.
कोट
नवीन यार्डमध्ये धान्यगृह तयार केले. मात्र कंत्राटदाराने वीज सुविधा उपलब्ध करून दिली नाही. काम अर्धवट आहे. त्यामुळे त्याची रीतसर सुरुवात करता आली नाही. तथापि या गोदामात धान्य ठेवले जात आहे.
- राजेंद्र पाटील
सभापती, बाजार समिती आर्णी