यवतमाळ : जिल्ह्यातील शेतीवर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा कहर सुरूच होता. जिल्हाभरात मंगळवारी १६ मिमी. पावसाची नोंद झाली. त्यातही उमरखेड व पुसद उपविभागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जवळपास ५ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. कापूस पावसात भिजल्याने त्याची प्रतवारी खराब झाली आहे. हवामान खात्याने आणखीन पुढील काही दिवस पावसाचा जोर सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
सरकारी शिरस्त्याप्रमाणे मंत्रालय स्तरावरून कृषी विभागाला नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या गारठवून टाकणारी थंडी व वादळी वारा असल्याने कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेली नाही. यापूर्वी नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या मोबदल्यात मात्र शेतकऱ्यांना एक छदामही मिळालेला नाही. हक्काचा पीक विमासुद्धा देण्यात आला नाही. आता रब्बी हंगामात या अवकाळी पावसाचे नवे संकट उभे ठाकले आहे. अशा स्थितीत सरकारी यंत्रणा व राज्य शासन शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. कापूस, तूर, कांदा, संत्रा या सर्वच प्रमुख पिकांचा हंगाम हातचा गेला आहे. कापूस ओला झाल्याने सरकीला कोंब फुटण्याचा धोका आहे. तुरीला फुले व कळ्या लागलेल्या असून, त्यावर या वातावरणात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा संकटात शेतकरी सापडला आहे.
जिल्ह्यात १६ मिमी. पावसाची नोंद
n पहाटे ८ पर्यंत १६ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक ५७ मिमी. पाऊस पुसद तालुक्यात पडला. यामुळे या ठिकाणच्या नदीनाल्यांना पूर आला. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याशिवाय या भागातील पिकांना मोठा फटका बसला. यवतमाळ शहरात १२ मिमी. पाऊस नाेंदविण्यात आला. बाभूळगाव १८, कळंब ७, दारव्हा २८, दिग्रस २६, आर्णी १२, नेर ३६, उमरखेड २, महागाव ३२, वणी १२, महागाव ५, झरी ६, केळापूर ३, घाटंजी २, राळेगाव ४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.