लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात पुसद आणि आर्णी तालुक्यात तसेच मुळावा परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली . पुसद तालुक्याच्या गौळ बुद्रुक परिसरात शनिवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण व गारवा होता. सकाळी दहाच्या सुमारास मुसळधार पावसाने गौळ परीसरात हजेरी लावली. पाण्याचे पाट वाहले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. आधीच परतीच्या पावसाने व पैंनगंगेच्या पुराने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं असतांना या अवकाळणी पावसाने ऊसाचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या गौळ बुद्रुक, जगापूर, शेंबाळ पिंपरीला चांगलाच तडाखा बसला. या भागात ऊस तोडणीची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असून अनेक शेतात ऊस तोडून टाकलेला पडून असतांना मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ऊस वाहतूक करणारि वाहने शेतात नेणे शक्य होत नाही. काही दिवस ऊस तोडणी ही बंद पडणार आहे. तोडून टाकलेला ऊस शेतकऱ्यांचा शेतातच वाळून हलका होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. गारवा आणि पाऊस अश्या दुहेरी संकटाचा सामना शेतकर्याना करावा लागत आहे. पण अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतकर्याना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार हे नक्की. हवामान बदलामुळे मानवी आरोग्यास हा पाऊस अपायकारक ठरू शकतो असं जाणकारांचे मत आहे