दारव्हा (यवतमाळ) : अवकाळी पावसासह गारपिटीचा दारव्हा तालुक्यातील ४५० हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना फटका बसला आहे. ऐन काढणीस आलेल्या गहू, हरभऱ्यासह भाजीपाला व फळझाडांना याचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान कोरडे असताना सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली.
गहू, हरभरा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार खोपडी, चोपडी, भांडेगाव, तेलगव्हाण, कुंड, चोरखोपडी, राजीवनगर, वागद बुद्रुक, कुऱ्हाड बुद्रुक, निळोणा, ब्रह्मनाथ, तळेगाव, मांगकिन्ही, कुंभार किन्ही, लोही, रामगाव रामेश्वर, सावंगी रेल्वे, हातोला, माहुली, ब्रह्मी, धामणगाव खुर्द, धामणगाव बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द, वरुड, कोहळा, बोदेगाव, करजगाव, कोलवाई, मानकी इमामपूर, इस्रामपूर, तरनोळी, नखेगाव, बरबडी, दारव्हा, भोपापूर, बोरगाव, इरथळ, भुलाई, घाटकिन्ही, हनुमान नगर, हातनी, दुधगाव, पिंपळखुटा, वागद, नांदगव्हाण आदी गावांतील पिकांचे नुकसान झाले. तसा प्राथमिक अहवाल कृषी सहायक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून महसूल विभागाला देण्यात आला आहे. काही ठिकाणी जनावरे जखमी झाल्याची माहिती आहे.