नागरिक त्रस्त : पूस धरणात २६ टक्के साठा पुसद : असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या ुपुसदकरांना आता नळाच्या पाण्यासाठीही तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. गत दोन आठवड्यांपासून शहरात अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांची धांदल उडत आहे. तर वेळ चुकल्यास पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. पुसद शहराला पूस धरणातून पाणीपुरवठा केला जातो. २० एप्रिल रोजी पूस धरणात २६ टक्के जलसाठा होता. सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून पाणी वितरण करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. पुसद शहरातील १५ प्रभागाला नगरपरिषद प्रशासन पाणीपुरवठा करते. सध्या दोन पाण्याच्या टाक्या असून तिसऱ्या टाकीचे काम पूर्णत्वावर आहे. पाणीपुरवठ्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने वेळापत्रक जारी केले असले तरी गेल्या १५-२० दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नळाला पाणी केव्हा येईल हे कुणीही सांगू शकत नाही. शंकरनगर, डुबेवार ले-आऊट, मोतीनगर या भागात रोज सकाळी ८.३० वाजता पाणीपुरवठा होत होता. आता कधी १० वाजता तर कधी ११ वाजता नळाला पाणी येते. अशीच अवस्था शहरातील इतरही भागात झाली आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास उशीर होतो. अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना तासन्तास घरी बसावे लागते. नगरपरिषद विविध प्रभागात पाणी सोडताना त्यात दुजाभाव करीत असल्याचे चित्रही काही भागात दिसत आहे. शहरात काही ठिकाणी अर्धा-पाऊणतास तर काही ठिकाणी दोन-दोन तास पाणीपुरवठा केला जातो. कमी पाणी आलेल्या भागातील नागरिकांना पिण्याऐवढेही पाणी मिळत नाही. तर अधिक प्रमाणात पाणी सुटणाऱ्या भागातील पाणी रस्त्याने वाहून जाते. काही भागात रात्रीच्यावेळी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे महिलांना रात्रभर जागावे लागते. एकीकडे पूस धरणात मुबलक पाणी असताना अवेळी पाण्याने त्रस्त करून सोडले आहे. (तालुका प्रतिनिधी)पाण्याचा अपव्यय टाळा-नगरपरिषदपुसद शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी जास्त असल्याने पाण्याच्या टाकीतील पातळी पाहून शहराला पुरवठा करावा लागतो. २४ तास पाण्याच्या टाक्या भरल्या जातात. विशेष म्हणजे येत्या उन्हाळ्यात पुसदकरांना नियमित पाणीपुरवठा होणार असून सध्या तिसऱ्या टाकीचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चार महिन्यात पुसद शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन सभापती राजू दुधे यांनी केले आहे.
पुसदमध्ये अवेळी पाणी
By admin | Published: April 21, 2017 2:19 AM