पांढरकवडा : गेली दोन वर्षे कोरोनाचा सामना करण्यात गेली असली तरी याही परिस्थितीत नगर परिषदेने मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला व काही प्रमाणात का होईना विकास कामांना गती दिली. आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आल्याचा दावा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.
पांढरकवडा शहरात अनेक विकासात्मक कामे झाली असली तरी काही भागांत अद्यापही पक्के रस्ते, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. भर उन्हाळ्यातही नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात मात्र नगर परिषद यशस्वी ठरली आहे. काही भागात पाइपलाइन लिकेज झाल्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत होता; परंतु तातडीने उपाययोजना करून ही समस्या तात्पुरती निकालात काढण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा योजना ही अनेक वर्षांपासून कार्यान्वित आहे. पाणीपुरवठ्याची पाइपलाइन अतिशय जुनी झाली असून ही संपूर्ण पाइपलाइन बदलण्याची आवश्यकता आहे. या कामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. या कामासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषदेतर्फे देण्यात आली. निधीअभावी अनेक विकास कामे रखडली होती; परंतु निधी प्राप्त झाल्यामुळे रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. चालू आर्थिक वर्षात १५ कोटींच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे. वाय पॉइंट ते जुना पशू दवाखाना, मुख्य रस्ता, डॉक्टर घावडे यांचा दवाखाना, जैन मंदिर ते स्मशानभूमी, विश्रामगृह, अग्रसेन भवन, जुना पशू दवाखाना, भूत ऑइल मिल, नवशक्ती दुर्गा मंदिर, महावितरण कार्यालय ते वनविभाग कार्यालयापर्यंतचा रस्ता या कामांसह इतर कामे, अशी १५ कोटींची कामे मंजूर झाली असून पावसाळा संपताच ही कामे तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ४७ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. खेलो इंडियाअंतर्गत पाच कोटी रुपये खर्चून स्वीमिंग पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी दोन ओपन स्पेस जागा निवडण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी.ची तयारी करणाऱ्या व इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अद्ययावत असे वाचनालय २५ लाख रुपये खर्च करून सुरू करण्यात येणार आहे. त्याचे कामही नगर परिषदेच्या मालकीच्या असलेल्या लोहारा लाइनजवळील इमारतीत सुरू आहे.
बॉक्स : या प्रमुख कामांकडे द्यावे लागणार लक्ष (१) शहरातील वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. हे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. शहरातील रस्ते मोठे असूनही वाढत्या अतिक्रमणामुळे ते अरुंद होत आहे. भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. (२) नवीन लेआऊटधारकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे व पार्किंगच्या व्यवस्थेकडे नगर परिषदेला लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही.
कोट : गेल्या चार वर्षांत भरपूर विकासात्मक कामे करण्यात आली. सिमेंट काँक्रीटचे रस्ते, नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. अनेक कामे मार्गी लागली असून काही कामे प्रगती पथावर आहेत.
- वैशाली नहाते, नगराध्यक्ष, पांढरकवडा.
कोट : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्यामुळे काही कामे निश्चितच खोळंबली होती; परंतु आता कामाचे नियोजन करून विकासकामे युद्धस्तरावर सुरू आहे. अनेक कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतिपथावर आहेत.
- राजू मोट्टेमवार, मुख्याधिकारी, पांढरकवडा.