लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा येथील मुथ्थूट फायनान्समध्ये गुरुवारी सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. मात्र या दरोड्यासाठी वापरलेले अग्नीशस्त्र रिव्हॉल्वर नसून लायटर बंदूक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या दरोड्याचे थेट यवतमाळ कनेक्शनही उघड झाले आहे. वर्धा येथील मुथ्थूट फायनान्समध्ये दरोडा टाकून नऊ किलो सोने, रोकड लुटण्यात आली होती. या गेम वाजवून दरोडेखोर घरी यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच वर्धा पोलिसांनी धामणगाव रोडवर करळगाव घाटात त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून नऊ किलो सोने, रोकड, वाहने असा पावणे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केले गेले. या दरोड्याचा मास्टर माईंड आणि घटनेला मुर्तरुप देणारे असे सर्वच यवतमाळचे निघाले. त्यातील काहींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. वर्धाचे एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांनी ही कामगिरी केली. अवघ्या आठ तासात हा दरोडा उघडकीस आणला. दरोड्यातील आरोपींमध्ये यवतमाळातील जीवन गिरडकर (उज्वलनगर), खुशाल आगासे (कोल्हे ले-आऊट), कुणाल शेंद्रे (उज्वलनगर), मनीष गोडवे (सरदार चौक) यांचा समावेश आहे. महेश यापूर्वी येथे श्रीराम फायनान्समध्ये होता. तेथील सोन्याच्या प्रकरणात त्याचा पर्दाफाश झाला. त्यामुळे त्याने वर्धेत मुथ्थुट फायनान्समध्ये नोकरी शोधली. मात्र तेथे ही त्याने गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्याचे दरोड्यात मास्टर माईंड म्हणून रेकॉर्डवर आल्याने दिसून येते. महेशची पोलिसांनी उलट तपासणी केली आणि अवघ्या काही तासात मुथ्थूट फायनान्समधील दरोड्याचे नेमके वास्तव उघड झाले.
एकावर होता खुनाचा गुन्हामुथ्थूट फायनान्सचा एक अधिकारी महेश श्रीरंग रा. वर्धा हा या दरोड्याचा मास्टर माईंड निघाला. तो पूर्वीचा यवतमाळातील उज्वलनगरचा रहिवासी आहे. जीवन याच्यावर यापूर्वीही शरीरासंबंधीचा गंभीर गुन्हा दाखल होता. तो आर्थिकदृष्ट्या सबळ आहे. खुशालचे येथील वीरवामनराव चौकात होलसेल मेडिकल शॉप होते. कुणालचे सुद्धा यवतमाळात अलिकडेच गाजलेल्या एका प्रकरणात कुठे तार जुळतात का याचा पोलीस तपास करीत आहे. त्या प्रकरणात कामवाल्या बाईचा कुणाल नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या त्या प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही, हे विशेष. मनीष हा येथे गाजलेल्या काेट्यवधी रुपयांच्या भूखंड खरेदी घोटाळ्यातील आरोपी आहे. तो क्रिकेट बुकी आणि मटका बाजारातील चॅनलमध्येही काम करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.