लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील वर्षभरापासून कोरोनामुळे प्रत्येक नागरिक दहशतीत आहे. देशाची अर्थव्यवस्था यामुळे बिघडली आहे. असे असले तरी शेती व्यवसायाने काही प्रमाणात तारले असून आजही कोरोनाच्या सावटामध्ये शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहे. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे त्यांना यंत्रावर अवलंबून रहावे लागत असून अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
शेतीचे काम करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरीने न उरकणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बळीराजा आपल्या शेतीतील मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहे. मात्र डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यंत्राद्वारे ही शेती करणे कठीण जात आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते. शेतकरी आता पर्यायी पिकांची लागवड करीत आहेत. दरम्यान, काही मोजके शेतकरी बैलजोडीद्वारे शेतीची कामे करून घेत आहेत.
काही वर्षापासून सालगड्याच्या मजुरीत वाढ झाल्याने बळीराजाने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. शेतीत अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे अधिक उत्पन्न मिळत नसल्याने बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. बळीराजाला शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यातच दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने बळीराजाचे शेतीचे गणित पार बिघडत चालले आहे. त्यातच मजुरांचे वाढते दर उत्पादन कमी व खर्च मात्र अधिक अशा दुहेरी संकटात शेतीव्यवसाय सापडला आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे.