ढाणकी : लगतच्या अकोली येथे ४० नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला.
कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांस सध्या लस देणे सुरु आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून, जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे व लसीकरण करून घ्यावे, या हेतूने अकोली ग्रामपंचायतीने गावातील ४० ज्येष्ठ नागरिकांना लोकवर्गणी करून स्कूल बस भाड्याने घेऊन ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेतले.
या उपक्रमामुळे इतरही गावातील नागरिक जागरूक झाले आहे. तेसुद्धा कोरोना लसीकरणासाठी समोर येत आहेत. अकोलीचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते देविदास जामकर, ग्रामपंचायत सदस्य माधव पवार, तलाठी गजानन सुरोशे, अमोल जामकर, कल्याण सोळंके यांनी जनजागृतीसाठी प्रयत्न केले. लोकवर्गणीसाठी माधव पवार, पंडितराव धात्रक, भाऊ देवसरकर, गजानन सुरोशे यांचा सहभाग लाभला. बसमालक ओम खोपे यांनी बसचे अत्यल्प भाडे घेऊन सहकार्य केले. पाण्याची व्यवस्था प्रहार तालुकाप्रमुख सय्यद माजिद यांनी केली.