लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिनापासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र, जिल्ह्याला १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी लागणारी लस जिल्ह्यात पोहोचली नाही. यामुळे हे लसीकरण एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यांत पाच केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी २०० केंद्रे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. मात्र, ही केंद्रे सुरू करण्यासाठी लागणारा लसींचा साठा मिळाला, तरच सुरू होणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात येणारा लसींचा साठा मागणीच्या तुलनेत अपुरा आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लागणारी लस जिल्ह्याला अद्यापही मिळाली नाही. शनिवारी ही लस दुपारनंतर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे या वयोगटातील लसीकरण करण्यासाठी एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. लसीकरणासाठी पाच केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळातील दोन अर्बन पीएचसी, पांढरकवडा, पुसद आणि दारव्हा या केंद्रांवर कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच ही लस मिळणार आहे. यामुळे ऑनलाईन नोंदणी न करता केंद्रावर पोहोचणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे. यामुळे आधी लसीकरणाचे कन्फर्मेशन झाल्यानंतरच लसीकरण केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यांचा एकूण आकडा पाहिल्यानंतर कुठल्या केंद्रावर किती लस पाठवायची याचे नियोजन होणार आहे. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना जवळच्या केंद्रांवर अथवा तालुक्याच्या ठिकाणी लसीकरणासाठी संपर्क करावा लागणार आहे. प्रत्येक केंद्रावर पाच व्यक्तींची टीम नियुक्त करण्यात आली आहे.लसीकरणाचे स्वतंत्र केंद्रसध्या सुरू असलेले लसीकरण केंद्र वगळता इतर ठिकाणी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे या सध्या सुरू असलेल्या केंद्रांवर कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही. या शिवाय कुठलाही गोंधळ उडाला तरी परिस्थिती हाताळणे सोईचे होणार आहे. तूर्त १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र टप्प्याटप्प्याने वाढविले जाणार आहे.
जिल्ह्याला १ मेपासून लसीकरण करता येणार नाही. ते एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र उघडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच केंद्र सुरू करण्यात येणार आहे. - श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ