उमरखेड : तालुक्यासाठी दररोज १००० डोसची मागणी असते. मात्र, जिल्ह्याकडून केवळ ४०० डोस देण्यात येतात. त्यामुळे तालुक्यात कारोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.
येथील उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयात दररोज १०० डोस येत आहेत. याशिवाय सेवा हॉस्पिटल येथे १०० डोस येत आहेत. उर्वरित डोस ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील प्राथमिक केंद्रांना देण्यात येतात. त्यामुळे लसींचा तुटवडा भासत आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उत्तरवार रुग्णालय व बाकी केंद्रांवर येतात. त्यांना डोस कमी येत असल्यामुळे केंद्रावरून परत जावे लागत आहे.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून नागरिक लसीचा कमी पुरवठा असल्यामुळे परत जात आहेत. त्यामुळे कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्याची मर्यादित वेळ निघून जाते की काय, अशी लोकांना भीती आहे.
उत्तरवार रुग्णालयासह शहरातील सेवा हॉस्पिटल, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा, ढाणकी, विडूळ, थेरडी आणि ब्राह्मणगाव येथील केंद्रातही कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. त्यातच पुन्हा लस केव्हा येईल व आपल्याला भेटेल की नाही, अशी भीती व काळजी उमरखेडकरांना व तालुक्यातील नागरिकांना सतावत आहे.
बॉक्स
ग्रामीण भागातही तुटवडा
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातही कोविड लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला लस मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेकांना लस न घेताच परत जावे लागत आहे. त्यातच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यामुळे केंद्रांवर गर्दी वाढत आहे. परिणामी दुसरा डोस मिळेल की नाही, असे नागरिकांना वाटत आहे. सरकारने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.