भारत-न्यूझिलंड सामना : दोघांना अटकयवतमाळ : भारत-न्यूझिलंड क्रिकेट सामन्यावर सुरु असलेला सट्टा रात्री १० वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने धाड घालून पकडला. यात दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमन गुल्हाने (१९), किशोर खंडरे (२४) अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध जुगार कायद्याच्या कलम ४,५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्या ताब्यातून सहा मोबाईल, टीव्ही जप्त करण्यात आला. मंगळवारी नागपुरात भारत-न्यूझिलंड संघादरम्यान टी-२० क्रिकेट सामना खेळला गेला. या सामन्यावर वैद्यनगरात हा क्रिकेट सट्ट सुरू होता. यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाला या सट्ट्याची टीप मिळाली. त्यावरून नीलेश राठोड, इकबाल शेख, प्रमोद मडावी यांच्या पथकाने धाड घातली. तेव्हा क्रिकेट सट्टा लावला जात होता. तेथून सहा मोबाईल जप्त केले गेले. त्या माध्यमातून या खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या दोघांचे कुठे-कुठे कनेक्शन आहे याचा शोध घेतला जात आहे. अमन हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तर किशोर हा एका मोबाईल शॉपीमध्ये काम करतो. जिल्ह्यात क्रिकेट सट्ट्यातील दरदिवशीची उलाढाल एक कोटींच्या घरात आहे. या सट्ट्याचा म्होरक्या सर्वश्रृत आहे. मात्र त्याच्यावर हात घालण्याची हिंमत अद्याप तरी पोलिसांनी दाखविलेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
वैद्यनगरात क्रिकेट सट्टा पकडला
By admin | Published: March 17, 2016 3:00 AM