वणी (यवतमाळ) : बाई आणि बाटलीच्या नादातच त्या अज्ञाताची हत्या करण्यात आल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. वणी शहरातील तहसील कार्यालयामागे असलेल्या एका पडक्या इमारतीत घडलेल्या या खून प्रकरणात मंगळवारी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. बुधवारी या तिघांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले. अवघ्या २४ तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
अनिकेत दादाराव कुमरे (२१, रा. सिंधी, ता. मारेगाव), मारोती लक्ष्मण कुळमेथे (३४, रा. गणेशपूर ता. वणी) व रोशनी कांचन भगत (२५, रा. पंचशील नगर) अशी आरोपींची नावे आहेत. रविवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या इमारतीत आरोपी व मृतक हे दारू पिण्यासाठी गेले होते. दरम्यान आरोपी अनिकेतने मृताकडे १०० रुपयांची मागणी केली. १०० रुपये मिळाल्यावर त्यांनी दारू विकत आणली व ते तिघे पुन्हा दारू पिण्यास बसले.
दारू ढोसल्यावर आरोपी अनिकेत व मारोती हे दोघे इमारतीबाहेर गेले. दरम्यान आत आरोपी रोशनी व अनोळखी इसम होता. तिथे अनोळखी इसम रोशनीशी शारीरिक लगट करत होता. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. आत वाद झाल्याचे लक्षात येताच, बाहेर थांबलेले महिलेचे दोन्ही साथीदार आत गेले. त्यांनी अनोळखी इसमाला लाथाबुक्क्या व विटांनी अमानुष मारहाण केली. त्यानंतर काहीही घडले नाही, अशा अविर्भावात ते तिघेही निघून गेले.
दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी शासकीय वास्तूत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पीएम रिपोर्टमध्ये इसमाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी रोशनी भगत व मारोती या दोघांना तहसील कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी असा काही प्रकार झाल्याचे नाकारत अनिकेत याने फक्त दोन थापडा मारल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी हा अनिकेत कोण? याबाबत विचारणा केली. अनिकेतबाबत माहिती घेतली, असता तो सिंधी येथील रहिवासी असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी शोध घेऊन दीपक टॉकीज चौपाटी परिसरातून आरोपी अनिकेतला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो मी नव्हेच म्हणणाऱ्या अनिकेतला जेव्हा पोलिसी खाक्या मिळाला. तेव्हा त्याने संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला व या प्रकरणाचे बिंग फुटले. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या आदेशावरून एपीआय राजेश पुरी, एपीआय माया चाटसे, एपीआय माधव शिंदे, एएसआय सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, पंकज उंबरकर, विकास धाडसे, वसीम शेख, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अजित जाधव करीत आहे
दारुसाठी मृतक आला आरोपींच्या संपर्कात
विशेष म्हणजे या तिन्ही आरोपींपैकी एकही आरोपी हे मृताला ओळखत नाही. दारू पिण्यातून त्यांची ओळख असल्याची माहिती आहे. दुसरी बाब म्हणजे खुनाच्या घटनेत मृताची ओळख पटलेली असते. मात्र या घटनेत मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही. मात्र तरीही खून करणारे आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहे.
'त्या' आत्महत्या प्रकरणातही सहभागाची चर्चा
आरोपी मारोती कुळमेथे हा रोशनीचा पूर्वाश्रमीचा पती आहे. काही काळापूर्वी ते दोघे वेगळे झाले होते. मात्र अलीकडच्या काळात तो पुन्हा रोशनीसोबत राहू लागला, तर अनिकेत हा रोशनीचा प्रियकर असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी शहरातील बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये अंकित चिकटे या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणातही यातील एका आरोपीचा संबंध असल्याची चर्चा आहे.