ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत. काही वर्षापूर्वी गुंजचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानाही अशाच पद्धतीने खाजगी व्यवस्थापनाच्या घशात गेला. आता वसंत ही त्याच वाटेवर असून ऊस उत्पादकासह कामगारही देशोधडीला लागणार आहे.शेतकरी कारखानदार झाला पाहिजे असे स्वप्न पाहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुसद उपविभागात सहकारी साखर कारखान्याची मुहूतमेढ रोवली. १९७२ साली उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे साखर कारखाना सुरू करण्यात आला. त्या पाठोपाठ महागाव तालुक्यातील गुंज येथे दुसरा साखर कारखाना सुरु झाला. पोफाळीच्या कारखान्याला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे तर गुंजच्या कारखान्याला माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांचे नाव देण्यात आले. १९७३ सालापासून पुसद उपविभाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. परिसरात आर्थिक समृद्धी आली. ऊस उत्पादक, कामगार, व्यापाºयांना सुगीचे दिवस आले. परंपरागत पीक पद्धत बदलून शेतांमध्ये उसाची लागवड होऊ लागली. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि मेहनती शेतकरी यामुळे हा परिसर समृद्ध होऊ लागला. सहकारी तत्त्वावरील या साखर कारखान्याने परिसराचे चित्र बदलविले.परंतु विदर्भातील सहकारी संस्थांची जशी अवस्था झाली तशी या कारखान्यांची झाली. अंतर्गत राजकारण आणि गैरप्रकार यामुळे कारखाने डबघाईस येऊ लागले. काही वर्षापूर्वी सुधाकरराव नाईक साखर कारखाना शिखर बँकेने कर्जापोटी विकला. तो पश्चिम महाराष्ट्रातील एका कारखानदाराने विकत घेतला. हा अनुभव पाठीशी असताना वसंतचे संचालक मंडळ धडा घेतील अशी आशा होती. परंतु त्यातून काहीही न शिकता वसंतचा कारभार अंधाधुंद सुरु राहिला. ४६ वर्षाच्या इतिहासात आर्थिक विपन्नावस्थेने वसंत कारखान्याच्या चिमणीतून धूर निघाला नाही. कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न झाले. परंतु कर्जाचा डोंगर असल्याने कुणीही उभे केले नाही. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेकडो कुटुंब देशोधडीला लागले.वसंत सहकारी साखर कारखान्यावर तब्बल १०० कोटींचे कर्ज आहे. त्यात जिल्हा बँकेच्या ४० कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. या कर्जासाठी बुधवारी जिल्हा बँकेने कारखाना आपल्या ताब्यात घेतला. दुसरीकडे कामगारांच्या ३० महिन्याच्या वेतनाचे १३ कोटी रुपये थकीत आहे. आता कारखाना सुरु होणार काय ?, कामगारांचे वेतन मिळणार काय ?, ऊस उत्पादकांचे केन पेमेंट कधी मिळणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार हा कारखाना बंद पडल्याने हिरावला आहे.‘वसंत’चा वापर खासगी मालकीसारखावसंत सहकारी साखर कारखान्याचा सुरूवातीचा काळ वगळला तर अलीकडच्या काळातील संचालक मंडळाने या कारखान्याचा वापर खाजगी मालकीसारखाच केला. राजकीय आखाडा करून या कारखान्याच्या माध्यमातून अनेकांनी चांगभलं करून घेतलं. कारखाना कर्जात दबत असतानाही कर्ज फेडण्यासाठी उपाय योजना झाल्या नाहीत. उलट कारखान्याची मालमत्ता गहाण ठेऊन नवीन कर्ज मिळविले. मात्र या कर्जाच्या परतफेडीचा गांभीर्याने विचारच झाला नाही.