लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना दिवंगत माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे तो विक्री होणार नाही, तसेच लवकरच पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात तत्काळ सहकारमंत्री व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘वसंत’ सहकारी साखर कारखाना अत्यंत अडचणीत सापडला आहे. या कारखान्याला वाचविण्यासाठी बुधवारी वसंतच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसंतच्या जीवदानाचे संकेत दिले. उमरखेड तालुक्याची कामधेनू असलेला व सहकार तत्वावर चालणारा विदर्भातील एकमेव कारखाना गेल्या एक वर्षापासून बंद आहे. गेल्या ३५ महिन्यांपासून कामगाराचे वेतन थकले आहे. इतराचेही कोट्यवधींचे देणे थकले आहे. नुकतीच जिल्हा बँकेने थकबाकीपोटी कारखान्याची स्थावर मालमत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.या सर्व घडामोडीनंतर आमदार राजेंद्र नजरधने यांच्या पुढाकाराने जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तत्काळ मुंबई जाण्याचा निर्णय वसंतचे अध्यक्ष अॅड. माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, विनोद जिल्हेवार, संचालक शिवाजीराव देशमुख, विजय जाधव आदींनी घेतला. या शिष्टमंडळाने प्रथम बुधवारी दुपारी २ वाजता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी वसंत कारखाना सुरू करण्यासंबधी आणि तो बँकेने विक्री काढू नये याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी ‘वंसत’ची विक्री होणार नाही, तो वाचविण्यासाठी तत्काळ शासन व बँक यांची बैठक घेण्याची ग्वाही दिली.हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे अॅड. माधवराव माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वसंत साखर कारखान्याला मिळणार जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:58 PM
पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना दिवंगत माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे तो विक्री होणार नाही, तसेच लवकरच पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची ग्वाही : ऊस उत्पादकांना अखेर दिलासा, बँक अधिकाºयांची घेणार बैठक