यवतमाळ : १ जुलै रोजी कृषी दिन म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती. ५ डिसेंबर १९६२ ते १९७५ या दीर्घ कालावधीसाठी महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब. १९६३, १९६७ व १९७२ असे तिनदा बिनविरोध मुख्यमंत्रीपदी निवड होणारे हरित क्रांतीचे जनक, महानायक वसंतराव नाईक साहेब. त्यांना जयंतीनिमित्त वंदन.
महानायक वसंतराव नाईक त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे कल्याणकारी लोकनेता, समाजसुधारक, नैतिक मूल्यांची जोपासना करणारे, शेतकरी व दीन दुबळ्यांचे, गोर-गरिबांचे दुःख स्वतःचे मानणारे, जनसेवा हाच धर्म मानणारे, शेतकरी व शेतमजुरांचे खरे कैवारी, कुशल प्रशासक, महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते, ग्रामीण भागातील युवकांच्या शिक्षणाची तळमळ असलेले, हळव्या मनाचे सक्षम व्यक्तिमत्त्व, अशा अनेक उपाधीचे जनक ठरले. त्यांच्या कार्यकाळातील शब्द वाक्यांची स्मृती म्हणून काही मोजकेच महत्त्वाचे शब्द ‘वसंतवाणी’ म्हणून प्रसिध्द आहे. त्यांचा प्रत्येक शब्द सूज्ञ माणसाला प्रेरणा देतो.
वसंतराव नाईक शब्दांचे धनी होते. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या काही वाक्यांची आठवण येते. ती वाक्ये पुढीलप्रमाणे आहे.
-- माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. जाती-धर्माच्या नावाखाली त्याला कमी लेखणे ही माणुसकी नाही.
-- शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी कारखानदार झालाच पाहिजे.
-- शेती ही उद्योगाची जननी आहे. या देशाची गरिबी दूर करण्याची क्षमता शेतीच्या उद्योगातच आहे.
--समाजातल्या समाजसेवकांची जाळे सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय समाजात चैतन्य व गतिमानता येणार नाही.
-- प्रत्येक माणसाची श्रमशक्ती ही फुकट न जाता ती देशाच्या विकासासाठी लागली पाहिजे.
-- माणसांनी माणसासोबत माणुसकीनेच वागले पाहिजे.
-- लोककल्याणाचे तत्त्वज्ञान जलसंवर्धनाच्या कार्यात ठासून भरले आहे. जलसंवर्धन म्हणजे विकासाच्या अनेक मार्गांची सुरुवात आहे.
-- पाणी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जलसंवर्धन कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे, तर समाजासाठी व समाजातील प्रत्येक घटकासाठी करण्याची गरज आहे.
-- पाण्याची तहान जशी सर्वांना लागते, तसेच जलसंवर्धनाच्या कामाकरिता सर्वांच्या सहभागाची व सहकार्याची गरज आहे.
-- जर आपल्याला पेटलेल्या पाण्यात अंगाची लाही-लाही होऊन द्यायची नसेल, तर आपण आपल्या जीवनात जलसंवर्धन, वृक्षसंवर्धनाकरिता श्रमदान करून घाम गाळला पाहिजे.
-- भूतलावरील कोणत्याही प्रदेशात मानवाला पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. भूमिगत सर्व स्तरातील पाणीसुद्धा पिण्यायोग्य आहे, असे मानणे संयुक्तिक ठरणार नाही.
-- आपण पाण्याने श्रीमंत असलो तरच विकास आणि भौतिक सुख सुविधा शक्य आहे.
बॉक्स
वसंतरावांच हातात महाराष्ट्र सुरक्षित
महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना लोकनेते यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, वसंतरावच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे. आता त्यांच्या स्वप्नातील धवलक्रांती व हरित क्रांती गतिमान होण्यासाठी निसर्ग संतुलित असणे आवश्यक आहे. त्याकरिता वृक्षारोपण, वृक्ष संगोपन आणि जलसंवर्धन करणे काळाची गरज आहे. महानायक वसंतराव नाईक यांची आठवण म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर व सर्वांनी घर परिसरात वृक्षारोपण केल्यास त्यांची खरी जयंती साजरी होईल.