लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसुधा प्रतिष्ठानच्यावतीने येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात प्रसिद्ध कवी, सिने पार्श्वगायक, संगीतकार प्रा. प्रशांत मोरे यांचा ‘आई : एक महाकाव्य’ हा आईवरील कवितांचा विशेष कार्यक्रम पार पडला. सर्व भारतीय भाषेतील आईचे महात्म्य सांगणाऱ्या कवींच्या कवितांची सुंदर गुंफन करून मोरे यांनी भारतातील ५६०० कार्यक्रमानंतर यवतमाळ नगरीत हा कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री मदन येरावार, प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. अशोक मेनकुदळे होते. प्रा.डॉ. रमाकांत कोलते यांनी अध्यक्षस्थान भूषविले.प्रा. प्रशांत मोरे यांनी सुरेश भट यांच्या ‘आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा’ या कवितेपासून कार्यक्रमाला प्रारंभ केला. महाराष्ट्रातील अप्रतिम कवितांची काव्यमाला आईस अर्पण करताना त्यांनी काव्यांना सुंदर चाली लावल्या. स.ग. पाचपोळ यांची मूळ कविता ‘हंबरूनी वासराले चाटते जेव्हा गाय, तिच्या मंदी दिसते मला तव्हा माही माय’ या काव्याने श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेण्यात मोरे यशस्वी झाले. कवियित्री बहिणाबार्इंच्या आईवरील काव्य, अशोक बुरबुरे यांचे काव्य, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोली भाषेतील काव्यातून त्यांनी आईला काव्यांजली समर्पित केली.यावेळी आपल्या कर्तृत्वाने आदर्शाचा उच्चांक गाठणाऱ्या महानुभावांचा गौरव करण्यात आला. वसंतराव शेटे स्मृती वीरशैव लिंगायत विदर्भरत्न पुरस्कार विडूळचे प्रा.डॉ. सचितानंद शंकर बिचेवार यांना देण्यात आला. सुधाताई वसंतराव शेटे स्मृती अक्का महादेवी माय माऊली पुरस्काराने विजया प्रदीपराव महाजन यांना गौरविण्यात आले. वसंतराव शेटे स्मृती वीरशैव लिंगायत समाज भूषण पुरस्कार शिवानंद मारोतराव घाटोळकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी पालकमंत्री मदन येरावार, डॉ. अशोक मेनकुदळे, प्रा. प्रशांत मोरे, डॉ. सचितानंद बिचेवार, शिवानंद घाटोळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. तुतारीच्या, शंखाच्या मंगलध्वनीच्या वातावरणात हे पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जयंत शेटे यांनी केले. आभार वसुधा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नीलेश शेटे यांनी मानले.
वसुधा प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:17 PM