पहाटेपासूनच गुंततात अनेक हात : राळेगाव तालुक्यातील ४० गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अशोक पिंपरे राळेगाव सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने वेडशी गावातील आबालवृद्ध ‘जीवना’धारासाठी झटत आहेत. गाव आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढावी, टिकून राहावी यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. या कामी श्रमदानात शेकडो हात गुंतले आहेत. राळेगाव तालुक्यातील ४० गावांमध्ये २२ मेपर्यंत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा राबविली जात आहे. यात वेडशी गावाचाही समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होणे किती महत्त्वाचे आहे, ही बाब सरपंच अंकुश मुनेश्वर यांनी ग्रामसभेतून गावकऱ्यांना पटवून दिली. श्रमदानातून पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला हो देत गावातील पुरुष, स्त्रिया, विद्यार्थी, विद्यार्थिनी दररोज सकाळी ७ वाजताच गावातील टेकडीवर जातात. पाणी फाऊंडेशनच्या नियमानुसार श्रमदानातून विविध कामे पूर्णत्वास गेली आहेत. गावातील आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे, हा ध्यास गावकऱ्यांनी घेतला आहे. सरपंच अंकुश मुनेश्वर, विठोबा काटकर, दादाराव चौधरी, तुळशीदास कुडमेथे, मोहन मोहुर्ले, प्रमोद चिव्हाणे, हनुमान उताणे, उपसरपंच नीळकंठ चौधरी, वसंत सोनुर्ले, चंद्रमणी पाटील, विशाल कोटरंगे, विनायक नखाते, कुणाल नखाते, प्रज्ज्वल डंभारे, वेदांत चौधरी, प्रज्ज्वल चंदनखेडे, विनय देहारे, बबन बोरकर, नितीन उताणे, गौरव निम्रड, धर्मपाल पाटील, पंजाबराव मोहुर्ले आदींकडून श्रमदान केले जात आहे. घरातील कामे पटापट आटोपते घेत महिलाही या चळवळीत सहभागी झाल्या आहे. कधीही अंगमेहनतीची कामे न केलेल्या महिलांच्या हातात पावडे, डोक्यावर टोपले हे चित्र आज वेडशीत पाहायला मिळत आहे. मनीषा चव्हाण, अन्नपूर्णा नखाते, वैशाली चौधरी आदी महिला श्रमदान करत आहेत.
वेडशीत जीवनाधाराला आबालवृद्धांची साथ
By admin | Published: April 27, 2017 12:27 AM