लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ नागपूर-हैद्राबाद तर राष्ट्रीय महामार्ग नागपूर-तुळजापूर हा जातो. या दोन्ही महामार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस चौक्या आहेत. त्या ठिकाणी वाहनांवर कारवाईकरिता इंटरसेप्टर वाहनातून कॅमेराद्वारे नजर ठेवली जाते. त्यात सुसाट वेगाने धावणार्या वाहनांना थेट ऑनलाईन चलान देवून दंड आकारला जातो. करंजी महामार्ग पोलिसांनी वर्षभरात १२ हजार ९०८ वाहनांकडून एक कोटी २९ लाख आठ हजारांचा दंड वसूल केली. तर धनोडा महामार्ग पोलिसांनी सात हजार ७९७ वाहनांवर कारवाई करत ४९ लाख ५९ हजारांचा दंड वसूल केला. राज्यात पहिल्या दहामध्ये कारवाई करण्याचा बहुमान करंजी महामार्ग पोलिसांनी मिळवला आहे. हेल्मेट नसलेल्या पाच हजार ७७६ दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून २८ लाख ३८ हजारांचा दंड वसूल केला आहे. इंटरसेप्टर वाहनातील कॅमेराद्वारे होणाऱ्या कारवाईमुळे कुणीही वाहनधारक सुटू शकत नाही. त्याला नियम मोडल्यास दंड निश्चत आहे.
यवतमाळातील चौकात सीसीटीव्हीतून वाहतूक नियंत्रण नाहीमहानगरामध्ये प्रमुख चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरातून नजर ठेवली जाते. ही प्रणाली यवतमाळ शहरात अद्याप पोहोचलेली नाही. यवतमाळातील काही प्रमुख चौकात ट्राफीक सिग्नल कार्यरत होते. आता विकास कामाच्या नावाने हे वाहतूक सिग्नलही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. चौकात वाहतूक पोलीस उभे राहूनही गोंधळलेल्या वाहतुकीला दिशा दाखविण्याचे काम करत नाहीत. उलट हे वाहतूक शिपाई रस्त्याच्या कडेला उभे राहून केवळ कारवाई करण्यातच धन्यता मानतात.
नियम मोडणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनाची नजरमहामार्गावर वाहन चालविताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनातील कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. आपण नियम मोडला, हे त्या वाहनचालकांना थेट दंडाची चलान मिळाल्यानंतरच माहीत होते. त्यांना ऑनलाईनच दंड भरावा लागतो.
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक कारवाईकोरोना महामारीत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली. ऑक्टोबर महिन्यात धनोडा येथील आणि करंजी येथील महामार्ग पोलीस चौकीअंतर्गत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. सुमारे चार हजार वाहनांना दंड ठोठावण्यात आला.
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या महामार्गावर वाहनांची गतीही तासी ९० किलोमीटर तर घाटात तासी ५० किलोमीटर इतकी निर्धारित करून दिली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांनाही कारवाई केली जात आहे. यातून शिस्त राखण्याचा प्रयत्न आहे. - संदीप मुपडे, सहायक पोलीस निरीक्षक, हायवे पोलीस