पुसद : यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा पूर्णपणे कोरडा गेला. आसुसलेल्या जमिनीवर पावसाचा थेंब नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी व्याकुळ झालेलं रान मात्र अचानक मुकं झालयं. बळीराजा उद्ध्वस्त आयुष्याला सावरण्याची गणित मांडत असतानाच पाऊस मात्र सतत हुलकावणी देतोय.सावकार, बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करताहेत. कसे तरी महागड ेबियाणे आणले. काहींनी जमिनीच्या पोटात टाकलय. पण पावसाचा पत्ता नाही. सावकार, सरकार, बोगस बियाणे यांच्या जुलुमी पाशात अडकलेला शेतकरी पावसाची वाट पाहतोय. पण निसर्गही त्यांच्यावर कोपलाय. मनामध्ये हिरव्या स्वप्नाचे जाळे विणत असताना ते बेईमान फसवे ढग येतात. अन् वाकुल्या दाखवून निघून जातात. कोरड्या ढगांची कोरडी सहानुभूती मनावर खोलवर वार करत आहे. पावसाचे हे धक्कातंत्र खरेच अनाकलनीय! पाणी टंचाईच्या भीतीने सर्वजण व्याकुळ झाले आहे. ढगांचा हा नकली चेहरा आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर पावसात पेरणी करीत आहे.परिसरात नदी, नाले, ओढे, विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत. त्यात भरीस भर शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त आयुष्यावर हसणारे ढग हा अनुभव गेल्या एक महिन्यापासून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपाच्या मोठ्या प्रमाणात उलटल्या आहेत. रोहिणी, मृग कोरडा गेला. नंतर थोडाफार पाऊस झाला. शेतकरी खूश झाला. पण हा आनंद क्षणभंगूर ठरला. आकाशात ढगांचे राज्य दिसते. आता खैर नाही. पाऊस वचपा काढणार. टपोर थेंबानी झोडपून काढणार अशा कल्पना मनात रेंगाळत असतानाच हवेच्या झोताने तो दूर कुठे निघून गेला कळलच नाही. (तालुका प्रतिनिधी)
पावसाच्या हुलकावणीने बळीराजा चिंतेत
By admin | Published: August 20, 2014 11:48 PM