लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या दोन-चार दिवसात पाऊस न आल्यास अमरावती विभागातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली आहे.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये खरिपाचे ३२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कपाशी व सोयाबीनचा पेरा होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीचा पेरा दहा टक्क्याने वाढला आहे. अमरावती, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात कपाशी तर अकोला, वाशिममध्ये सोयाबीनचा पेरा अधिक आहे. परंतु यावर्षी पावसाची स्थिती पाहता सर्वच पिकांचे सरासरी उत्पादन घटणार आहे. मुळातच काही भागात पेरणी कमी झाली आहे. अमरावती जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये ६० टक्केच पेरणी झाली. पावसाअभावी सर्वच जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. पुढील दोन-चार दिवसात पाऊस न पडल्यास पाचही जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची स्थिती आहे. त्यात सर्वाधिक ४० हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील आहे. वाशिम दहा हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे कृषी सूत्रांनी सांगितले. मुळात पाऊसच नसल्याने आता दुबार पेरणीही साधणार नाही. त्यामुळे शेतकºयांना रबी हंगामावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यातही पाण्याची उपलब्धता कशी राहते यावर सर्व भिस्त आहे.सहसंचालकांचा प्रभार वाशिमकडेअमरावतीच्या कृषी सहसंचालकांची पदोन्नतीवर पुण्याला बदली झाली. ते तेथे सेवानिवृत्तही झाले. तेव्हापासून अमरावतीच्या कृषी सहसंचालकांचे पद रिक्त आहे. आतापर्यंत या पदाचा अतिरिक्त प्रभार यवतमाळचे अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्याकडे होता. परंतु पुणे येथील बदलीवर ते गुरुवारी कार्यमुक्त झाल्याने सहसंचालकांचा प्रभार आता वाशिमच्या कृषी अधीक्षकांकडे देण्यात आला आहे.