राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा : संभाजी देवतळे, दिलराज शेंगर ‘मॅन आॅफ द डे’यवतमाळ : येथील अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात सुरू असलेल्या राज्यस्तरीय (विदर्भ) खो-खो स्पर्धेत पुरुष गटात विदर्भ युथ काटोल, तुळजाई परतवाडा तर महिला गटात यजमान नवजयहिंद यवतमाळ, मराठा फ्रेण्डस क्लब अमरावती संघाने दमदार कामगिरी करीत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला.नवजयहिंद क्रीडा मंडळाने २४ ते २६ डिसेंबरपर्यंत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात उपांत्य फेरीत चुरशीचे सामने रंगले. पुरुष गटात पहिला उपांत्य सामना विदर्भ क्रीडा मंडळ काटोल विरुद्ध विदर्भ युथ क्लब काटोल संघात झाला. या सामन्यात विदर्भ युथ संघाने नऊ गुणांनी विजय प्राप्त केला. पराभूत संघाच्या उल्हास काटकरला उत्कृष्ट खेळीबद्दल सामनावीराचा बहुमान मिळाला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तुळजाई परतवाडा संघाने मातब्बर अशा शेषस्मृती तळवेल (अमरावती) संघाचा आठ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मितेश पारधेला सामनावीर घोषित करण्यात आले. महिला गटात छत्रपती क्रीडा मंडळ नागपूर विरुद्ध नवजयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ संघात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात नवजयहिंदने सहा गुणांनी विजय मिळविला. या सामन्यात सामनावीराचा बहुमान मात्र नागपूर संघाच्या दीपाली रुबाने हिने पटकाविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मराठा फे्रण्डस क्लब अमरावती संघाने नागपूरच्या आरपीटीएस संघाचा तब्बल एक डाव चार मिनिट राखून दारुण पराभव केला. गीता गुबे ही सामनावीर ठरली.आयोजकांच्या वतीने मॅन आॅफ द डे आणि वूमन आॅफ द डेचे पुरस्कार देण्यात आले. शेषस्मृती तळवेल संघाचा आक्रमक खेळाडू संभाजी देवतळे आणि विदर्भ मंडळ घरटोल संघाचा दिलराज शेंगर यांना ‘मॅन आॅफ द डे’ तर ह्युमिनिटी क्रीडा मंडळ परतवाडाची समीक्षा आमझरे व छत्रपती क्रीडा मंडळ नागपूरची दीपाली सबाने वूमन आॅफ द डे ठरले. पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना ट्रॅकसूट व स्पोर्टस कीट बॅग भेट देण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)
विदर्भ युथ, तुळजाई, नवजयहिंद, मराठा संघ अंतिम फेरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2015 2:51 AM