वनमंत्र्यांचे भाऊ यवतमाळ जिल्हा परिषदेचे सभापती; काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी दोन सभापती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 02:31 PM2020-01-27T14:31:51+5:302020-01-27T14:34:42+5:30
जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यवतमाळ : शिवसेना नेते, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे ज्येष्ठ बंधू विजय दुलिचंद राठोड यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदी निवड निश्चित झाली आहे.
सोमवारी जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेनेच्या वाट्याला दोन पदे आली. त्यासाठी ज्येष्ठ सदस्य श्रीधर मोहोड आणि ना. संजय राठोड यांचे बंधू विजय राठोड यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसच्या वाट्याला दोन पदे आली असून त्यासाठी जयश्री पोटे आणि राम देवसरकर यांनी नामांकन दाखल केले.
जयश्री पोटे यांना महिला व बाल कल्याण, तर राम देवसरकर यांना बांधकाम समिती मिळण्याची शक्यता आहे. या समित्यांवर शिवसेनेकडून दारव्हा व केळापूर, तर काँग्रेसकडून कळंब व उमरखेड तालुक्याचे वर्चस्व राहिले आहे. सभापतीपदासाठी एक-एकच नामांकन आल्याने बिनविरोध निवड निश्चित झाली असून त्याची अधिकृत घोषणा तेवढी बाकी आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात आली आहे. कालिंदा पवार यांच्या रूपाने अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर या राष्ट्रवादीच्या सदस्याला उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. सभापतीपदे शिवसेना व काँग्रेसने वाटून घेतली.