यवतमाळचे विलास राऊत कॉंग्रेसमधून निलंबित
By विशाल सोनटक्के | Published: June 27, 2024 03:49 PM2024-06-27T15:49:02+5:302024-06-27T15:51:07+5:30
Yavatmal : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून कारवाई
यवतमाळ: लोकसभा निवडणूक प्रचारापासून दूर राहणे आर्णी येथील कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विलास मारोतराव राऊत यांना चांगलेच भोवले आहे. प्रदेश कॉंग्रेसने पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना कॉंग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले आहे.
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख विरुद्ध महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यामध्ये थेट सामना रंगला होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार देशमुख यांच्या पाठीशी जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्ष ठामपणे सोबत असताना आर्णी येथील पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विलास राऊत हे मात्र महाविकास आघाडीच्या प्रचारापासून दूर होते. प्रचारादरम्यान सभा मेळाव्यालाही त्यांची अनुपस्थिती होती. याबाबतच्या तक्रारी प्रदेश कार्यालयाकडेही गेल्या होत्या. अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून राऊत यांना पुढील सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे प्रशासन व संगठन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी याबाबतचे पत्रक २७ जून रोजी जारी केले.