लोणी घाटानाची घटना : गुन्हा दाखल अकोलाबाजार : काळाबाजारात जाणारा रेशनचा धान्यसाठा गावकऱ्यांनी पकडून दिल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लोणी (घाटाना) येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी परवानाधारक महिला बचत गटाच्या अध्यक्षासह पाच जणांवर वडगाव जंगल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.लोणी घाटाना येथील स्वस्त धान्य दुकान यवतमाळच्या स्वामी समर्थ महिला बचत गटाला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. गत तीन महिन्यांपासून अंत्योदयच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड व बँकेचे पासबुक नसल्याचे कारण सांगून धान्य दिले जात नव्हते. हे शिल्लक धान्य लोणी येथून यवतमाळमध्ये नेऊन त्याची काळ्याबाजारात विल्हेवाट लावली जात होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजता धान्य दुकानातून एका वाहनात २५ हजाराचे धान्य भरुन विक्रीसाठी जात असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. गावकऱ्यांनी याला विरोध करून तहसीलदारांना माहिती दिली. त्यावरून तहसीलचे पुरवठा निरीक्षक योगिराज निवल घटनास्थळी आले. त्यांनी धान्यासह वाहन वडगाव पोलीस ठाण्यात नेले. पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा ढाले रा. यवतमाळ यांच्यासह हमाल व चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. (वार्ताहर)
काळाबाजारात जाणारा रेशनचा धान्य साठा गावकऱ्यांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2015 2:20 AM