लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या वडकी येथे ३० खाटांचे ट्रामाकेअर असलेले ग्रामीण रुग्णालय देण्यात यावे, या मागणीसाठी वडकी ग्रामस्थांनी रविवारी पोलीस ठाण्यावर धडक देऊन आंदोलन केले. यात अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.वडकी हे गाव जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर आहे. चौफुलीवर असल्याने तालुक्यातील ५२ गावांची बाजारपेठ येथे आहे. रुग्णालय नसल्याने अपघातातील जखमींना आपला जीव गमवावा लागला. येथे ३० खाटांचे ट्रामा केअर असलेले शासकीय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. यासाठीच सामाजिक कार्यकर्ते सचीन किन्नाके यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. शासन हुलकावणी देत असून या मागणीकडे डोळेझाक करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. वडकी येथील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन रविवारी दुपारी ३ वाजता स्थानिक राळेगाव टी-पॉर्इंटवरून सचीन किन्नाके, हबीब पठाण यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी मोर्चा काढला. हा मोर्चा वडकी येथे ग्रामीण रुग्णालय झालेच पाहिजे अशा घोषणा देत राळेगाव पोलीस ठाण्यावर धडकला. मोर्चात प्रहार संघटनेसह भारत मुक्ती मोर्चा या संघटनेने सहभाग घेतला होता. दरम्यान यापुढे आपण वेगळी सभा घेऊन टाळी वाजवा आंदोलन, घंटानाद आंदोलन, धरणे आंदोलन, साखळी उपोषण, रस्ता रोको, राजकीय पुढाऱ्यांना घेराव, निषेध नोंदविणे, गावबंदी, गाव तेथे आंदोलन आणि त्यानंतर विधानसभेवर लाँगमार्च करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मोर्चात विमल जुमनाके, विद्या लाड, अनिता केराम, संगीता आत्राम, माया येलके, शुभांगी कोरडे, सरपंच दिलीप कडू, अशोक वानखेडे, संजय कोरडे, नारायण कांबळे, फिरोज शेख, प्रहार संघटनेचे नरेंद्र झिले, युवराज हनुवंते, अरुण केराम, हेमंत वाभीटकर, जगदीश गोबाडे, शेशीम कांबळे आदींसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
रुग्णालयासाठी वडकीत ग्रामस्थांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:38 PM
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या वडकी येथे ३० खाटांचे ट्रामाकेअर असलेले ग्रामीण रुग्णालय देण्यात यावे, या मागणीसाठी वडकी ग्रामस्थांनी रविवारी पोलीस ठाण्यावर धडक देऊन आंदोलन केले.
ठळक मुद्देअनेक संघटनांचा सहभाग : पोलीस ठाण्यासमोर आंदोलन