लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : निसर्गाची किमया खूप सुंदर आहे तसेच निसर्गाने अनेक चमत्कार केले. त्या चमत्कारात वनसंपदेचा समावेश होताे. आज वनसंपदेत विविध प्रकारची वन औषधे व झाडे पाहायला मिळतात. त्या झाडांमध्ये मोह, चिंच, आवळा, चारबी, बायवा, टेंबूर, साग, खैर, सालाई, चाराई व इतर झाडेही आढळून येतात. उन्हाळ्याची चाहुल लागताच आता ग्रामीण भागातील ग्रामस्थ रानमेव्याचा गोडवा चाखताना दिसत आहेत.
मोह, चाराई, चिंच, टेंबूर व कविठ ही मानवाला नगदी पैसे देणारी झाडे आहेत. ग्रामीण भागात लग्न समारंभात चिंचेचा वापर कढी करण्यासाठी केला जातो, तर मोहाच्या झाडापासून मोहफुले व टोरी ही फळे किंवा बिया मिळतात. यापासून विविध पदार्थ केले जातात. खैरापासून कात, तर कविठाचा उपयोग ग्रामीण भागात मानवाच्या खाद्य पदार्थात केला जातो. कविठापासून लोणचे, चटणी, मुरब्बा बनविला जातो तसेच टेंबूर आणि चारबीचा वापर खाण्यासाठी करतात. त्यामुळे या सर्वांना रानमेवा असे म्हटले जाते.
सध्या जंगलातील टेंबूर व कविठ ही फळे निघायला सुरुवात झाली आहे, तर चारबी निघायला सुरुवात होणार आहे. कविठ, चिंच, सालाई व खैर ही सर्व झाडे जंगलात आढळून येतात. यामधील चारबी खायला गोड व आंबट असते, तर टेंबूर गोड आणि चिकूपेक्षाही पौष्टिक व चविष्ट असतात. चारबीला २० वर्षाच्या आधी ग्रामीण भागात चारांच्या बियांना फोडून बियांमधून निघणाऱ्या पौष्टिक पदार्थांपासून विविध पदार्थ केले जात होते. गुळाच्या पोळ्यामध्ये आणि लाडवात लाडू बनविताना ते टाकले जात. शहरी भागात रानमेव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानमेव्याची चव शहरी लोक कितीही पैसे देऊन आनंदाने चाखतात. शहरात या फळालाही भक्कम मागणी असते; परंतु झाडतोडीमुळे रानमेवा मिळणे आजघडीला कठीण जात आहे.