आढावा सभा ठरली देखावा : आर्णीसह १२ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठाआर्णी : पाणीटंचाई तालुक्यातील गावांसाठी बारमाही बनलेली आहे. टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न झाला नाही. आर्णीसह १२ गावांची मदार केवळ टँकरवर आहे. काही गावात लोक स्वत:हून टंचाईनिवारणाचे काम करीत आहे. मात्र, कायमस्वरुपी उपायांसाठी पुढाऱ्यांनी पुढाकार घेतलेला नाही.आमदार, खासदार टंचाईबाबत आढावा बैठक घेवून मोकळे होतात. या बैठका म्हणजे केवळ देखाव्यापुरत्या होत आहेत. दरवर्षी पाच-सहा गावातच टँकर लागायचे. यावेळी मात्र आर्णीसह १२ गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यात आर्णी नगरपरिषदेमध्ये ११ टँकर तर ग्रामीण भागातील ११ गावात नऊ टँकर सुरू आहे. यामध्ये पाळोदी, सुधाकरनगर, जाम, खेड, शिरपूर, जवळा, जवळा हेटी, माळेगाव, इचोरा, दहेली या गावांचा समावेश आहे. तेथे कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतलेला नाही. आमदार ख्वाजा बेग यांनी तालुक्यातील सिंचनावर काम करणाऱ्या सर्व विभागांची एक बैठक लावली होती. परंतु कृषी विभागाने कामांबाबत आमदारांना नीट माहितीसुद्धा दिली नाही. ही बाब आमदारांनी जाहीर कार्यक्रमातूनही सांगितली. परंतु कृषी विभाग ताळ्यावर आला नाही. आपले काम कुठे चालू आहे, हे माहीत झाले तर त्यावर लोकांचा वॉच राहील, बोगस कामे करता येणार नाही, या भीतीपायी आमदारांना माहिती देण्यास चालढकल करण्यात आली. आमदार ख्वाजा बेग यांनी काही गावात पायी फिरून पाण्याची, सिंचनाची माहिती घेतली. परंतु संबंधित विभागाने या प्रयत्नावर पाणी फेरले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कृषी विभागाकडून गाळ उपसण्यासाठी पैसे आले. परंतु त्याची अंमलबजावणी दिसत नाही. सुकळी गावात लोकांनी स्वत: गाळ उपसण्यास सुरुवात केली. त्याबाबत झालेल्या प्राथमिक बैठकीला कृषी विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. आर्णीत डॉ.अविनाश पौळ, पोपटराव पवार, डॉ.नीलेश हेडा ही मोठी माणसे सिंचन वाढले पाहिजे म्हणून वेळोवेळी येवून गेली. पुरुषोत्तम गावंडे, आमदार ख्वाजा बेग यांचीही तळमळ आहे. परंतु तालुक्यातील प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेवून बसले आहे. सिंचन वाढविण्यासाठी पुरुषोत्तम गावंडे यांनी सातारा येथील डॉ.अविनाश पौळ यांना सहा वर्षांपूर्वी आर्णीत आणले. मागील महिन्यात पर्यावरण तज्ज्ञ डॉ.नीलेश हेडा यांना आणले. आमदार बेग यांनी हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांना आणले. त्याचा चांगला परिणाम म्हणून तालुक्यात काही ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे पुढे आले आणि कामही सुरू झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
गावकरी जागले, पण पुढारी झोपेतच
By admin | Published: May 20, 2016 2:14 AM