लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना महामारीच्या संकटात निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक नियमांचा व मोटर वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ५८ हजार १३८ केसेस दाखल झाल्या. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणात दंडापोटी एक कोटी १९ लाख ४२ हजार ८०० रुपये वसूल केले. यातही विना मास्क फिरणाऱ्यांवर केलेल्या कारवाईची रक्कम वगळलेली आहे. कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत होती. पूर्णत: लाॅकडाऊन असूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत होते. अशांना पोलीस कारवाईचा फटका बसला आहे. मागील वर्षी २०२० मध्येसुद्धा पाच महिन्यांच्या कालावधीत लाॅकडाऊन होते. या काळात वाहतूक पोलिसांनी एक कोटी २१ लाख २१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला होता. या दंडात्मक कारवाईनंतरही अनेकजण जुमानत नसल्याचे चित्र आहे. आता कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोणी तयारी करताना दिसत नाही. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध प्रकारच्या मोहिमा राबविण्यात येत आहेत. जेणेकरून गर्दी टाळता येईल व अपघात कमी होतील.
विना सीट बेल्ट सर्वाधिक दंड वसूलजानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत विना सीट बेल्ट प्रवास करणाऱ्या पाच हजार ३९३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल दहा लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
मोटर वाहन कायद्यानुसार केसेसइतर मोटर वाहन कायद्यानुसार सर्वाधिक ४६ हजार ९३५ केसेस करण्यात आल्या. त्यात ९६ लाख ८१ हजार ३०० इतका दंड वसूल झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही कारवाई अधिक प्रमाणात आहे. यापुढेही कारवाई सुरू आहे.
कोरोनाची तिसरी लाट थांबविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता सूट मिळाली असली तरी स्वत:ची काळजी घेत मास्कचा वापर करावा. कुठेही गर्दी करू नये. ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह करणे टाळावे. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीतूनही कोरोना संसर्गाला आळा घालता येतो. त्यामुळेच धडक मोहीम हाती घेतली आहे. दररोज अधिकाधिक केसेस करण्यावर भर आहे. नागरिकांनी सतर्क राहून स्वत:सह समाजाला सुरक्षित ठेवावे, हीच अपेक्षा आहे. त्याकरिताच वाहतूक नियमांची सक्ती आहे.- श्याम सोनटक्के, जिल्हा वाहतूक शाखा निरीक्षक, यवतमाळ