लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघाच्या बछड्यांवर कायमची नजर ठेवता यावी म्हणून वन विभागाने त्यांच्या शरीरावर ‘रेडिओ कॉलर’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तेराहून अधिक मानवी बळी घेऊन देशभरात गाजलेल्या अवनी वाघिणीचा खात्मा झाला. मात्र तिच्या बछड्यांचा अद्यापही जिल्ह्यातील जंगल परिसरात वावर आहे. पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत टिपेश्वर अभयारण्यात तीन बछडे (मेल टायगर) आहेत. दोघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. अवनी वाघिणीचेच ते बछडे असल्याला मात्र दुजोरा मिळालेला नाही. रविवार २४ फेब्रुवारी रोजी डॉ. बिलाल हबीब पेंच व्याघ्र प्रकल्पाची चमू सकाळपासून या बछड्यांच्या मागावर होती. या मोहिमेत हे बछडे टिपण्यासाठी कक्ष क्र. ९९, १००, १०१, १०२, १०५, १०६, ११० मध्ये २५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. ट्रॅकिंग टीमचीही या शोध मोहिमेत मदत घेण्यात आली. अखेर सोमवारी सकाळी कक्ष क्र. १०१ मध्ये एक बछडा निदर्शनास आला असता भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनचे पशुचिकित्सक डॉ. पराग निगम यांनी त्याला सकाळी ११ वाजता बेशुद्ध केले व रेडिओ कॉलर लावून पुन्हा जंगलात सोडण्यात आले. दुसऱ्या बछड्याचा शोध घेतला जात आहे. या चमूमध्ये पेंचचे डॉ. चेतन पातोड, पल्लवी घासकरवी, पांढरकवडाचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) संदीप चव्हाण, एसीएफ अमर सिडाम यांचा समावेश आहे. स्वत: शिकार करणाऱ्या या बछड्यांची गावकऱ्यांमध्ये अजूनही दहशत आहे.डेहराडूनच्या शास्त्रज्ञाला दिली परवानगीपूर्व विदर्भातील वाघांच्या ११ बछड्यांना जेरबंद करून रेडिओ कॉलर लावले जाणार आहे. त्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून येथील शास्त्रज्ञ डॉ. बिलाल हबीब यांना वन्यजीव विभागाने परवानगी दिली आहे. त्यात टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या दोन बछड्यांचा समावेश आहे.
वाघिणीच्या एका बछड्याला ‘रेडिओ कॉलर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:01 PM
वाघाच्या बछड्यांवर कायमची नजर ठेवता यावी म्हणून वन विभागाने त्यांच्या शरीरावर ‘रेडिओ कॉलर’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तेराहून अधिक मानवी बळी घेऊन देशभरात गाजलेल्या अवनी वाघिणीचा खात्मा झाला. मात्र तिच्या बछड्यांचा अद्यापही जिल्ह्यातील जंगल परिसरात वावर आहे.
ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्य : चमू अन्य एकाच्या मागावर