रूपेश उत्तरवार
यवतमाळ : संपूर्ण विदर्भातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या विषाणूजन्य व्हायरसने हल्ला चढविला आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील विकसित वाण या रोगाला बळी पडले आहे. इतर वाणांवरही मोझॅकचा धोका वाढला असून, शेत शिवार वेळेआधीच पिवळे पडत आहे.
गतवर्षी एका विशिष्ट जातीला सर्वाधिक सोयाबीनचा ॲव्हरेज मिळाला. गतवर्षी सततचा पाऊस होता. यावर्षी वातावरण विपरीत स्थितीत आहे. उन्हाचा चढता पारा आणि ढगाळ वातावरण या बदलाला पश्चिम महाराष्ट्रातील विकसित जाती विदर्भात तग धरू शकत नसल्याची बाब सध्यातरी पुढे आली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या पाहणीमध्ये फुुले संगम, फुले दुर्वा, फुले किमया या जातींच्या वाणावर येलो मोझॅक या विषाणूने हल्ला केला आहे. हा विषाणूजन्य कीड प्रकार असल्याने तो फवारणीमधूनही रोखता येत नाही. यातून शेत शिवार पिवळे पडत आहेत. विशेष म्हणजे सोयाबीनच्या शेंगा भरण्यापूर्वीच झाड पिवळे पडल्याने या शेंगाही गळून पडत आहेत. त्यात सोयाबीनचा दाणाही भरला जात नसल्याचेच पुढे आले आहे. यामुळे शेतकरी हादरले आहेत.
भौगोलिक परिस्थितीत शिफारस करणारे वाण तग धरून
भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक क्षेत्राचे वाण आणि त्याच्या जाती आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील या वाणाने गतवर्षी विदर्भात विक्रमी उत्पादन दिले. गतवर्षी पूर्णवेळ ढगाळी वातावरण आणि सतत पाऊस होता. यामुळे हे वाण टिकले. यावर्षी त्याच्या विपरीत चित्र आहे. यामुळे येलो मोझॅकचा प्रभाव काही ठिकाणी दिसत आहे.
या ठिकाणी दिसला व्हायरस
यवतमाळ, दारव्हा, पुसद आणि उमरखेड तालुक्यात येलो मोझॅक व्हायरसने हल्ला चढविला आहे. यात दारव्हा तालुक्यातील कामठवाडा, चाणी आणि चिकणी तर यवतमाळ तालुक्यातील हिवरी क्षेत्रात दृष्टीस पडला आहे. सर्वच जिल्ह्यातील शेतकरी दहशतीत आले आहेत.
पांढऱ्या माशीने केला घात
येलो मोझॅक असणाऱ्या भागात पांढऱ्या माशीचा उपद्रव आहे. यामुळे विषाणूजन्य व्हायरस पसरत आहे. पिवळे चिकट सापळे लावल्यास आणि लिंबोळी औषधांची फवारणी केल्यास अशा रोगाला रोखता येते. मात्र, व्हायरसचे आक्रमण झाल्यावर त्याला रोखता येत नाही. प्रारंभी दोन चार झाडे पिवळी दिसल्यास अशी झाडे उपटून टाकावी आणि ती पेटवावी. यामुळे रोग पसरणार नाही. रोग आल्यावर उपाय करता येत नाही. त्यासाठी वेळेपूर्वीच उपाय आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विकसित फुले वाण याला बळी पडल्याचे दृष्टीस पडले आहे. याशिवाय इतरही जाती याला बळी पडत आहेत.
- डॉ. प्रमोद मगर, कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ