लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुर्गम खेड्यातील विद्यार्थी म्हणजे मळकटलेले कपडे आणि दुर्मुखलेले चेहरे एवढेच चित्र पांढरपेशा शिक्षण तज्ज्ञांच्या नजरेपुढे तरळत असते. मात्र हा अपसमज पूर्णपणे पुसून टाकण्यात मारेगाव कोरंबी या छोट्याशा खेड्यातील जिल्हा परिषद शाळेने यश मिळविले आहे. या शाळेची गुणवत्ता पाहून पुण्याच्या बालभारतीने ‘व्हर्च्युअल क्लासरुम’चे साहित्य देऊन ही शाळा राज्यातील विविध नामांकित शाळांसोबत कनेक्ट केली आहे. त्यामुळे मारेगावच्या विद्यार्थ्यांना राज्यातील इतरही दर्जेदार शाळांमधून थेट मार्गदर्शन मिळण्याचे दालन खुले झाले आहे.मारेगाव कोरंबीमध्ये कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात माहिती कोंबण्यापेक्षा त्यांना स्वत: अध्ययन करण्यास प्रवृत्त केले आहे. परिणामी या खेड्यातील विद्यार्थी आपसात चक्क फ्लूएंट इंग्रजीमध्ये सहज संभाषण करताना दिसतात. हे चित्र शहरी शाळांनाही चकित करणारे ठरत आहे. शाळा डीजिटल करण्यासाठी या खेड्यातील गोरगरीब पालकांनी चक्क एक लाख रुपयांची वर्गणी गोळा करून दिली. आता विविध शैक्षणिक अॅप हाताळून येथील विद्यार्थी आधुनिक पद्धतीचे शिक्षण घेत आहे. पूर्वी अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी डीजिटल साहित्यामुळे आता अधिक उत्सुकतेने आणि निसंकोचपणे अध्ययनात सहभाग घेत आहे. पहिली, दुसरीचे विद्यार्थी कोट्यवधीच्या संख्यांचे गुणाकार सहज करून दाखवितात. हे पाहून पालकच नव्हे तर शिक्षण विभागाचे अधिकारी देखील शाबासकीची थाप देऊन जातात.गृहपाठाचीही वेळ निश्चितशाळेसोबतच विद्यार्थ्यांच्या गृहपाठाचेही येथे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. रात्री ९ ते १० हा एक तास गृहपाठासाठी राखीव करण्यात आला आहे. या तासात पालकही पोरांसोबत असतात.शाळेची गुणवत्ता पाहून या शैक्षणिक सत्रात १३ विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेन्टमधून मारेगावच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले आहे. खासगी शाळांप्रमाणेच येथेही पालकांचा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करून पालकांना नियमित शाळेच्या संपर्कात ठेवण्यात शिक्षकांना यश आले आहे.२१ व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ग्रामीण मुलांना सक्षम करण्यावर आमच्या शाळेचा भर आहे. त्यासाठी न्यूनगंड दूर करून प्रथम विद्यार्थ्यांना बोलके केले.- अरविंद गांगुलवार, मुख्याध्यापकग्रामीण शाळा शहरांपेक्षा कमी नाही हे आमच्या शिक्षकांनी सिद्ध केले. शाळेतील विविध उपक्रमांमुळे आमच्या विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती वाढत आहे. शाळा समितीही सक्रिय राहून शाळेच्या अडचणी सोडवित आहे.- मोहनराव कुचनकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती.दोन वर्षापूर्वी गुणवत्तेचा मागमूसही नसलेल्या या शाळेला नवे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नवे रुप दिले. पालक म्हणून आम्हाला या जिल्हा परिषद शाळेचा अभिमान आहे.- अविनाश टोंगे, पालकविद्यार्थ्यांना आव्हानगटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनातून मारेगावच्या शाळेत ‘विद्यार्थ्यांना आव्हान’ देण्याचा नवाच उपक्रम उपयुक्त ठरला. अभ्यासातील हे आव्हान पूर्ण करताना विद्यार्थी प्रत्येक विषयात तरबेज होत आहे.
बालभारतीने ‘व्हर्च्युअल कनेक्ट’ केलेली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 6:00 AM
मारेगाव कोरंबीमध्ये कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात माहिती कोंबण्यापेक्षा त्यांना स्वत: अध्ययन करण्यास प्रवृत्त केले आहे. परिणामी या खेड्यातील विद्यार्थी आपसात चक्क फ्लूएंट इंग्रजीमध्ये सहज संभाषण करताना दिसतात. हे चित्र शहरी शाळांनाही चकित करणारे ठरत आहे. शाळा डीजिटल करण्यासाठी या खेड्यातील गोरगरीब पालकांनी चक्क एक लाख रुपयांची वर्गणी गोळा करून दिली.
ठळक मुद्देमारेगाव कोरंबीच्या गुणवत्तेची घोडदौड : आपसात इंग्रजी संभाषण सहज करणारे विद्यार्थी ठरले आकर्षण