अतिसार नियंत्रण : ओआरएसचे घरोघरी वाटपयवतमाळ : सततच्या पावसामुळे बालकांमध्ये जलजन्य आजार (अतिसार) पसरण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने अतिसार नियंत्रक पंधरवाड्याचे नियोजन केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात २८ जुलैपासून हा पंधरवाडा राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत आरोग्य कर्मचारी जिल्ह्यातील दोन लाख ६९ हजार बालकांना घरी जाऊन भेटी देणार आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अतिसार नियंत्रक पंधरवाड्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राठोड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गृहभेटीमध्ये एकही बालक सुटता कामा नये, अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी मुद््गल यांनी संबंधितांना केल्या. गृहभेटीचा कार्यक्रम राबवित असताना तो चांगल्या प्रकारे राबविला जात आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील दोन लाख ६९ हजारावर बालक असून गावपातळीवर आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, मदतनिस तसेच आवश्यक तेथे आरोग्य कर्मचारी या कामासाठी नेमण्यात येणार आहे. सदर कर्मचारी बालकांच्या घरी जाऊन त्यांची पाहणी करतील. बालकांना अतिसार झाल्याचा संशय असल्यास त्याला झिंकच्या गोळ्या दिल्या जातील. तसेच प्रत्येक बालकाच्या घरी ओआरएसचे एक पाकिट या भेटीत देण्यात येणार आहे. पंधरवाड्यादरम्यान करावयाच्या गृहभेटीचे प्रशिक्षण संबंधितांना देण्यात आल्याची माहिती बैठकीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राठोड यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यातील दोन लाख ६९ हजार बालकांना भेटी
By admin | Published: July 25, 2014 12:04 AM