यवतमाळ : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्याची मागणी करत कळंब तालुक्यातील वटबोरी येथील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक व पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर सकाळी ११ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. तगड्या पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी मतदान सुरू झाले.
वटबोरी या गावातील १९ वर्षीय मुलगी बेपत्ता आहे. या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. परंतु ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही. यामुळे शुक्रवारी संपूर्ण गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. पोलिस उपअधीक्षक दिनेश बैसाने, कळंब येथील तहसीलदार धीरज थूल, जोडमोहा येथील मंडळ अधिकारी प्रशांत गढीकर आदींनी मध्यस्थी केली.
या प्रकाराशी संबंधित लोकांना हुडकून काढून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजता मतदान सुरू झाले.