सांडपाणी रस्त्यावर : सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य, पाण्यासाठी भटकंतीच यवतमाळ : काही महिन्यांपूर्वी शहरानजीकच्या वाघापूर, उमरसरा, वडगाव, भोसा, पिंपळगाव, लोहारा, मोहा या ग्रामपंचायतींचे विलिनिकरण यवतमाळ नगर परिषदेत करण्यात आले आणि या सर्व ग्रामपंचायत परिसरातील समस्यांमध्ये वाढ झाली. किंबहुंना ग्रामपंचायतकडून ज्या नियमित सेवा पुरविण्यात येत होत्या, त्या बंद पुर्णपणे झाल्या आणि नगर परिषदेने या परिसरातील समस्यांची अद्याप दखलच घेतलेली नाही. उमरसरा, वाघापूर, पिंपळगाव या परिसरात भर पावसाळ्यातही अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. नळाला पूर्वीप्रमाणे फोर्स नाही. त्यामुळे आजही अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पूर्वी तिसऱ्या माळ्यावर चढणारे पाणी आता ग्राऊंड फ्लोअरवर सुद्धा चढत नसल्याचे दिसते. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक नागरिकांनी आपल्या घरातच तीन ते चार फुटांचे खड्डे खोदले आहेत. या खड्डयात उतरून नळाचे पाणी घ्यावे लागते. पावसाळ्याचे दिवस असुनही नाल्याच नियमित साफ केल्या जात नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. वडगाव परिसरातील दांडेकर ले-आऊट, सानेगुरूजी नगर, आशिर्वाद नगर, परोपटे ले-आऊट, उमरसरा परिसरातील यशोधरा नगर, निखिल नगर, नरेंद्र नगर, प्रेरणा नगर आदी परिसरात नाल्या व सांडपाण्याचा तीव्र प्रश्न आहे. हिच परिस्थिती भोसा परिसरातील सुनील मोरे नगरासह सव्वालाखे ले-आऊट व इतर ठिकाणीसुद्धा आहे. वाघापूर, लोहारा, भोसा याही ठिकाणी सांडपाणी व अस्वच्छतेचा तीव्र प्रश्न आहे. बहुसंख्य परिसरात अद्याप नाल्यासुद्धा नाहीत. १५ ते २० वर्ष जुन्या ले-आऊटमध्ये अद्याप नाल्यांचे बांधकामच न झाल्यामुळे नागरिकांना आपले आरोग्य धोक्यात टाकून दिवस काढावे लागत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून पथदिवे बंद पडल्याच्या तक्रारी केल्यानंतरही कुणी येऊन पहायला तयार नाही. उमरसरा परिसरातील यशोधरा नगरातील सर्व म्हणजे चार ते पाच पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रभर या परिसरत काळोखाचे राज्य असते. याबाबत उमरसरा ग्रामपंचायतमध्ये ठेवलेल्या तक्रार नोंदवहीत नोंद करूनही त्याची दखल मात्र घेण्यात येत नाही. केवळ तक्रारी करा आणि निघून जा, असे धोरण नगर परिषद प्रशासनाकडून अवलंबिले जात आहे. त्यामुळे पुर्वीच्या ग्रामपंचायती बऱ्या होत्या, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. सर्वत्र सांडपाणी ठिकठिकाणी साचलेले पावसाचे डबके आणि त्यातच डुकरांचा हैदोस ही परिस्थिती सर्वत्र आढळून येते. अनेक भागातील घंटागाड्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे कचरा कुठे टाकावा ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. वाघापूर परिसरातील विद्या विहार, सानेगुरूजी नगर, शुभम कॉलनी, राधाकृष्ण नगरी आदी ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. कच्चे रस्ते असल्यामुळे दुचाकी किंवा सायकल घरापर्यंत पोहचत नाही. रस्त्यावर सर्वत्र चिखल असल्यामुळे पायी चालणाऱ्यालाही कसरत करावी लागते. अनेकजण आपली वाहने रस्त्यावरच उभी करून घराकडे जातात. अशा स्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेताना हाल होतात. विद्यार्थी वेळेवर शाळेत पाहचू शकत नाही. संपूर्ण रस्ते खड्डयांनी व्यापले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा रोष वाढतच आहे. (प्रतिनिधी) नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ शहरानजीकच्या नव्यानेच विलिनीकरण करून घेतलेल्या ग्रामपंचायत परिसरातील समस्यांबाबत नगर परिषद पूर्णपणे अनभिज्ञ आहे. सबंधित नगरसेवक निवडणूक होऊ द्या नंतर पाहू, असे म्हणून वेळ मारून नेतात. सर्वांचे लक्ष केवळ नगर परिषदेच्या निवडणुकांवर आहे. नागरिकांच्या समस्यांशी कुणालाही घेणे-देणे नाही. ग्रामपंचायतचे माजी पदाधिकारी म्हणतात आता आमच्या हातात काही नाही, तर पालिका प्रशासन म्हणते तुम्ही सध्या ग्रामपंचायत कार्यालयातच तक्रारी करा, तिथे आमचा माणूस बसविला आहे. हा माणूस काय करतो, कधी असतो, हे नगर परिषदेलाही माहित नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष असून हा रोष नगर परिषद निवडणुकीत निश्चित दिसून येईल, यात शंका नाही.
वाघापूर, उमरसरातील समस्यांमध्ये पडली भर
By admin | Published: July 27, 2016 12:34 AM